धुळ्यातील शासकीय ग्रंथालयात निधीअभावी ९ वर्षांपासून ग्रंथ खरेदी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:45 PM2018-02-27T14:45:40+5:302018-02-27T14:45:40+5:30
मराठी राज्यभाषा दिन : माय मराठीवर होतोय अन्याय, वर्ग बदल न झाल्याने ‘गाव तेथे ग्रंथालया’ला बसला आळा
अतुल जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भाषा संवर्धनाचे सर्वात महत्वाची भूमिका ग्रंथालये बजावित असतात. असे असले तरी ग्रंथालयांनाही ग्रंथ खरेदीसाठी निधीची चणचण भाषत असते. धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालयात निधीअभावी गेल्या ९ वर्षात ग्रंथाची खरेदीच झालेली नाही. येथील ग्रंथसंपदेची संख्या ५४ हजारांवरच थांबलेली आहे.
ग्रंथ हे आपले गुरू आहेत. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करू, तितके आपणच समृद्ध होत असतो.
धुळ्यात जिल्हा शासकीय ग्रंथालय आहे. सुरवातीला या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी निधी मिळायचा. मात्र २००९मध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी यायचा तो बंद झाला होता. त्यानंतर निधी मिळण्यासाठी जो पाठपुरावा करायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी गेल्या ९ वर्षात शासकीय ग्रंथालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधीच मिळाला नाही. निधीअभावी या शासकीय ग्रंथालयात नवीन पुस्तकांची भरच पडलेली नाही.
जिल्ह्यात २२२ वाचनालये
शासकीय ग्रंथालय अंतर्गत जिल्ह्यात २२२ वाचनालये आहेत. यात ‘अ’वर्गाचे ४, ‘ब’वर्गाचे ३४, ‘क’वर्गाचे ६३ व १२१ ग्रंथालये ही ‘ड’ वर्गात आहेत. विशेष म्हणजे या ग्रंथालयांमध्ये नियमित पुस्तकांची खरेदी होत असते.
नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही
२०१२ मध्ये महसूल यंत्रणेमार्फत ग्रंथालयांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळालेली नाही.
९०० वैय्यक्तीक सभासद
जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे ९०० वैय्यक्तीक सभासद आहेत. त्यांच्याकडून १०० रूपये अनामत रक्कम व वर्षाला १० रूपये फी घेतली जाते. त्या मोबदल्यात त्यांना दोन पुस्तके दिली जातात. वैय्यक्तीक सभासदांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जास्त समावेश आहे.
नाशिक विभागात अव्वल
वैय्यक्तीक सभासदांच्या बाबतीत धुळे जिल्हा शासकीय ग्रंथालय हे नाशिक विभागात अव्वल आहे. शासकीय ग्रंथालयामार्फत शाळा, महाविद्यालय, वाचनालय, ग्रामपंचायत यांनाही सभासद केले जाते. अशा सभासदांची संख्या ८० आहे. यांच्याकडून ५ रूपये अनामत रक्कम व १५० रूपये वार्षिक फी आकारून त्यांना ५० पुस्तके ठराविक कालावधीत परत करायची या अटीवर दिले जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्टÑात दरवर्षी ५ हजार ग्रंथ छापले जातात. त्यापैकी किमान २ हजार ग्रंथ खरेदी करून, वाचकांना ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे वाचकांच्या ज्ञानात भर पडते. ग्रंथ खरेदी करणे हा ग्रंथालयांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शासकीय ग्रंथालयाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे.
-संजय मस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी