सरकारची काटकसर, पुरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:53+5:302021-06-02T04:26:53+5:30
गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गरोदर तसेच स्तनदा मातांबरोबर सदरील वयोगटातील बालकांनाही आता कोरडा शिधा दिला जात आहे़ ...
गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गरोदर तसेच स्तनदा मातांबरोबर सदरील वयोगटातील बालकांनाही आता कोरडा शिधा दिला जात आहे़ त्यात गहू, तांदूळ, मूगदाळ, हरभरा डाळ, मिठ, हळद, मिरची आणि गोडेतेलाचा समावेश होता़
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून सध्या १७० रुपये प्रति किलोपर्यंत भाव पोहोचला आहे़ त्यामुळे पोषण आहाराचे लाभार्थी अडचणीत सापडत आहेत़ फोडणीविना आहार कसा घ्यावा, असा प्रश्न आहे़
काय-काय मिळते?
लाभार्थ्यांना नियमित चवळी/चना दाळ, मूग/मसूर दाळ, गहू, मिरची, हळद, मीठ दिले जाते़ मात्र, यापूर्वी खाद्यतेल दिले जात होते, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे़
कुपोषित बालके, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना १६६ ग्रॅम, गरोदर महिला व स्तनदा मातांना १९५.५ ग्रॅम, ६ महिने ते ६ वर्षे वयोगटासाठी १०३ ग्रॅम, ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी १६२ ग्रॅम वजनाचे कच्चे धान्य व किराणा मालाचा पॅकिंग करून पुरवठा केला जातो़
शासनाच्या निर्णयानुसार केले जाते वाटप
चार महिन्यांपासून शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचा आदेश दिला असून त्यानुसार पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत आहे़ सदरील साहित्याचे व्यवस्थित वाटप होत आहे़
- किशोर शिंदे,
बालविकास प्रकल्प अधिकारी, शिरपूर
फोडणी कशी द्यायची?
अंगणवाडीमार्फत घरपोच पूरक पोषण आहाराचे साहित्य मिळत आहे. मात्र, चार महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी साखर दिली जाते; परंतु फोडणीसाठी तेलाचीच गरज असून शासनाने तेलच द्यावे. तरच या योजनेचा खरा लाभ मिळेल.
-सुनीता पावार,
महिला लाभार्थी
तेल महागले म्हणून साखर देणे योग्य नाही. ज्या वस्तू सुरुवातीपासून देण्यात येत आहेत, त्याचाच अंगणवाडीत पुरवठा झाला पाहिजे. आजच्या स्थितीत सर्वसामान्यांना तेल घेणे शक्य नसल्याने तेलाच पुरवठा करावा.
- मंगला पाटील
महिला लाभार्थी
कोरोनाच्या काळातही अंगणवाडीतून पूरक पोषण आहार वाटप केला जातो ही चांगली बाब आहे. मात्र, एखादी वस्तू महागली म्हणून ती बदल करून दुसरी वस्तू वाटप करणे अयोग्य आहे. ही लाभार्थ्यांची फसवणूकच आहे.
- रणजित पावरा,
पालक.