गोदामातून चोरलेले ४० क्विंटल सोयाबीन वाहनासह हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:33 PM2019-04-03T18:33:36+5:302019-04-03T18:35:07+5:30
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरची घटना : पोलिसांनी केले तिघांना जेरबंद; गुन्ह्याची कबुली
लोकमत आॅनलाईन
धुळे : साक्री तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातील गोदाम फोडून त्यातील चोरलेले ४० क्विंटल सोयाबीनसह वाहन असा मिळून पाच लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पिंपळनेर पोलिसांना अवघ्या १२ तासांत यश मिळाले. चोरीची ही घटना १ एप्रिल रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी पिंंपळनेर येथील व्यापारी सतीष कोठावदे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांनी शेतक-यांकरून खरेदी केलेले ४० क्विंटल सोयाबीन त्यांच्या देशशिरवाडे येथील गोदामात ठेवले होते. चोरट्यांनी ३१ मार्च रोजी रात्री या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून प्रतिक्विंटल ३६०० रुपये या प्रमाणे १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४० क्विंटल सोयाबीन चोरून नेले होते. या प्रकरणी मंगळवार २ रोजी रात्री साडेअकरा वाजता पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तत्परतेने तपास करून दत्तू रामदास पवार (५०) रा.धोंगडे, ता.साक्री ईश्वर मधुकर खैरनार (३५) मूळ रा.बल्हाणे, ता.साक्री (ह.मु.बिलदा, ता.नवापूर), व प्रशांत साहेबराव पवार (२८) रा.बल्हाणे, ता.साक्री यांना त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली.
मुद्देमाल १२ तासांत हस्तगत
त्यांच्याकडून १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४० क्विंटल सोयाबीन व ते त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला एमएच १८ एम ५०३८ या क्रमांकाचा व चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ५ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासांत हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पी.जे.राठोड, उपनिरीक्षक बी.बी. न-हे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी.डी.अमृतकर, आर.आर. राजपूत, पोलीस नाईक डी.डी. वेंदे, पोली कॉन्स्टेबल व्ही.पी. मोहने, भूषण वाघ, अंजुम शेख यांनी केली. गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे.