लौकी शिवारातून स्पिरीटचे ड्रम हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:52 PM2019-04-25T18:52:23+5:302019-04-25T18:53:55+5:30
२१ हजारांचा मुद्देमाल : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कारवाई
लोकमत आॅनलाईन
शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातून २ स्पिरीटने भरलेले २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम हस्तगत केले़ त्याची किंमत २१ हजार २०० रुपये इतकी आहे़ दरम्यान जप्त करण्यात आलेले स्पिरीट बेवारस आढळून आले आहे़
शिरपूर तालुक्यातील लौकी शिवारातील दगडी खदानीजवळ लौकी-हाडाखेड रस्त्याशेजारी बेकायदेशीर आणि अवैधरित्या स्पिरीट लपवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ त्यानुसार, माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी त्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता २ स्पिरीटने भरलेले २०० लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे ड्रम आढळून आले़ त्याची किंमत २१ हजार २०० इतकी आहे़ सापडलेला बेकायदेशीर स्पिरीटचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिरपूर विभागाने ही कारवाई केली़ शिरपूर विभागाचे निरीक्षक ए़ यू़ सूर्यवंशी, हाडाखेडचे निरीक्षक व्ही़ बी़ पवार, दुय्यम निरीक्षक एम़ पी़ पवार, एऩ एस़ गायकवाड, हाडाखेड नाकाचे आऱ जे़ जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक एस़ एस़ गोवेकर, जवान शांतीलाल देवरे, प्रशांत बोरसे, कपिल ठाकूर, केतन जाधव, आऱ बी़ चौरे यांच्या पथकाने स्पिरीटचा मुद्देमाल जप्त केला़