दोंडाईचात किराणा दुकान फोडले ५० हजाराच्या डाळी लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:38 PM2020-05-17T20:38:46+5:302020-05-17T20:39:10+5:30
शनिवारी पहाटेची घटना : चोरीच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण
धुळे : बंद दुकानाचा फायदा उचलत चोरट्याने दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातील डाळीसह धने आणि जिरे असा एकूण ४८ हजार ९९० रुपये किंमतीचा ऐवज लांबविला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़
दोंडाईचा येथील सिंधी कॉलनीत राहणारे शोभराज भावनदास कुकरेजा (५३) यांचे भावनदास अॅण्ड लालचंद नावाचे इंदिराचाळ येथे किराणा मालाचे दुकान आहे़ सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे कुकरेजा हे दुपारीच ठरवून दिलेल्या वेळेतच दुकान बंद करुन घराकडे मार्गस्थ होतात़ चोरट्याने देखील हीच संधी साधली़ कुकरेजा नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करुन घरी आले़ चोरट्याने शुक्रवार १५ मे रोजी दुपारी २ ते शनिवार १६ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी तोडली आणि शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला़ चोरट्याने ३० किलो ग्रॅम वजनाचे ७ कट्टे वजनाची १७ हजार ३२५ रुपये किंमतीची तुरडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे २ कट्टे वजनाची ६ हजार ८५५ रुपये किंमतीची मुगडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे २ कट्टे वजनाची ३ हजार ३०० रुपये किंमतीची चनाडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे ३ कट्टे वजनाची ५ हजार ७६० रुपये किंमतीची धने, २५ किलो ग्रॅम वजनाचे ४ कट्टे १५ हजार ७५० रुपये किंमतीची जिरे असा एकूण ४८ हजार ९९० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे़ दरम्यान, चोरट्याने गल्ल्यातील रकमेसह कोणत्याही वस्तुला हात लावलेला नाही़
नेहमीप्रमाणे कुकरेजा आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर कोणीतरी वाकवून चोरी केल्याचे लक्षात आले़ घटनेचे गांभिर्य ओळखून दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली़ शनिवारी दुपारी याप्रकरणी भादंवि कलम ४५४, ४५७, ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़