पाष्टे गावात बंदोबस्तात केली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:53 PM2019-02-18T22:53:01+5:302019-02-18T22:54:32+5:30
विना परवानगी पुतळा अनावरण प्रकरण : आता पुतळ्याचा ताबा ग्रामपंचायतीकडे, विधीवत करणार अनावरण
नरडाणा : येथून जवळ असलेल्या पाष्टे गावात रविवारी रात्री विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण झाल्याप्रकरणी निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून सोमवारी तेथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा विधीवत अनावरणासाठी तेथील ग्रा.पं.च्या ताब्यात दिला आहे.
गावात दोन दिवसांपूर्वी गावातील काही अज्ञात तरुणांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेसमोर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. या घटनेची माहिती तेथील पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी येथील पोलिसांना दिली. त्या नंतर सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी गावात जाऊन हा पुतळा काढून घेण्याची विनंती केली. परंतु तरी पुतळा काढण्यात आला नाही.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी राजगुरू यांनी तहसीलदार सुदाम महाजन, ग्रामविस्तार अधिकारी भामरे, सरपंच आशाबाई भील यांच्या उपस्थितीत संबंधित पुतळा काढून येथील पोलीस ठाण्यात आणला.
तेव्हा त्यास विरोध दर्शवलेल्या काही युवकांना येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. तसेच गावात वातावरण तणाव निर्माण झाला. दरम्यान, याबाबत वृत्त कळताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील आदी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्याने संध्याकाळी पुतळा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला. तसेच रितसर परवानगी घेऊन पुतळ्याचे अनावरण करावे, अशी सूचना दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तहसीलदार सुदाम महाजन, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, दोंडाईचा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, शिंदखेडा पोलीस निरीक्षक भरत जाधव, बीडीओ मनीष पवार, ग्रामसेविका भामरे आदी उपस्थित होते.
मात्र नंतर युवकांना मारहाण करणाºया पोलीस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे गावात पुन्हा तणाव निर्माण झाला. गावात शांतता रहावी यासाठी गावात आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.