पालकमंत्र्यांनी पकडलेल्या १८ वाळूच्या ट्रकांच्या माहितीचा अहवाल आरटीओकडून मागविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:12 PM2020-08-17T22:12:49+5:302020-08-17T22:13:43+5:30
सर्व ट्रक गुजरात पासींगचे : गुजरातमध्ये रॉयल्टी बनवून वाळू आणल्याची कागदपत्रे आढळली
धुळे : पालकमंत्र्यांनी १८ वाळूचे ट्रक पकडल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांकडे तपासणी व चौकशीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यांची चौकशी आमच्या स्तरावर पूर्ण झाली असून आरटीओ विभागाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ अहवाल आल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल अशी माहिती ग्रामीण तहसीलदार किशोर कदम यांनी दिली़ हे सर्व ट्रक गुजरात राज्याच्या पासींगचे असून त्यांच्याकडे गुजरातमध्ये रॉयल्टी भरुन तेथूनच वाळू आणल्याची कागदपत्रे आढळून आली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार दोन दिवसांच्या जिल्हा दौºयावर आले होते़ शनिवारी सायंकाळी औरंगाबादकडे रवाना होत असताना चाळीसगाव रोडवरील शिरुड चौफुलीवर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून आले़ त्यातून पाण्याची गळती होत असल्याचे पालकमंत्र्यांना दिसून आले़ त्यांनी वाहन थांबवून वाहनचालकांची चौकशी केली़ या वाहनचालकांकडे गुजरात राज्यातून वाळू आणल्याची रॉयल्टी मिळून आली़ पालकमंत्र्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रांची चौकशी करुन दोषींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ पालकमंत्र्यांनी वाळूची वाहने पकडल्यामुळे महसूलसह पोलीस यंत्रणा खळबडून जागी झाली़ ग्रामीण तहसीलदार किशोर कदम यांनी तालुका पोलिसांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेतले आणि एमआयडीसीच्या ट्रक ट्रर्मिनस येथे नेले़ पालकमंत्र्यांच्या कारवाईनंतर वाळू वाहतूक करणाºया वाहनांची धरपकड सुरु झाली असून ठिकठिकाणी ५० हून अधिक वाहने ताब्यात घेण्यात आले आहेत़ पालकमंत्र्यांनी ही वाहने पकडून महसूल यंत्रणेला जागे करण्याचे काम केले आहे़ ग्रामीण तहसीलदारांच्या चौकशीनंतर ही वाहने आता आरटीओ कार्यालयाकडे पुढील चौकशी आणि पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ त्यामुळे पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी किती वाहनांवर कारवाई होणार, किती वाहनांना अभय मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला नाही़ यामुळे वाळूचा उपसा आणि वाहतूक केवळ कागदोपत्रीच बंद आहे़ विविध ठिकाणाहून अजूनही चोरटी वाळूची वाहतुक, उपसा सुरुच असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे़ सध्या पावसामुळे नद्यांना पाणी असल्यामुळे वाळूची वाहतूक बंद आहे़ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाळूची वाहतूक सुरुच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे़