धुळेकरांसाठी पालकमंत्री उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 07:48 PM2020-08-27T19:48:06+5:302020-08-27T19:48:25+5:30
कोरोनाचा धसका : विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुढे यावे म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सायंकाळी चौका चौकात जात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री श्री. सत्तार यांनी तिरंगा चौक, गांधी पुतळा, शंभर फुटी रोड, दत्त मंदिर चौक येथे कॉर्नर सभा घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी आमदार डॉ. फारुख शाह, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आदी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार यांनी धुळे शहरातील विविध भागांना भेट देत तेथे कोपरा सभा घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनाविषाणू पासून घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, नियमितपणे मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत. तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.