Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:40 PM2022-09-30T22:40:43+5:302022-09-30T22:49:36+5:30

Gulabrao Patil : "शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले."

gulabrao patil slams shivsena uddhav thackeray Over Political situation | Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

धुळे - उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात हिंदुत्वाशी फारकत घेतली होती, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शुक्रवारी सायंकाळी शिंदे गटाने सैनिक कल्याण भवन येथे आयोजित केलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख तुळशिराम गावित, नंदुरबारचे जिल्हाप्रमुख विरसींग वसावे, महानगर प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, संजय गुजराथी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले. महाविकास आघाडी मधून बाहेर पडा असे उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सांगितले मात्र त्यांनी ऐकून न घेतल्याने उठाव करावा लागला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सतीश महाले तयारीला लागा...

गुलाबराव पाटील यांना धुळे शहरातून सतीश महाले निवडणूक लढवतील याचे संकेत दिले. विधानसभा निवडणूकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. आजपासून तयारीला लागा असे फर्मान त्यांनी महाले यांना सोडले.

शरद पाटील यांना निवडून आणण्यासाठी घेतली मेहनत 

माजी आमदार शरद पाटील मला विरोध करत आहेत मात्र त्यांना निवडून आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. धुळे शहरात उमेदवारी देत शिवसेना नेतृत्वाने हिलाल माळी यांची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

समित्यांमध्ये ५० टक्के वाटा द्या - रघुवंशी

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर पक्षात फुट पडली नसती. जे झाले ते विसरा आता कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. शासकीय व अशासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला ५० टक्के वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

"८०० फुटाच्या घरात राहतो, ईडीची भीती नाही"

ईडीच्या धाकामुळे बंड केल्याचा आरोप केला जातो. मात्र मी आजही ८०० फुटाच्या घरात राहतो, माझी कोणतीही कंपनी नाही त्यामुळे ईडीची भीती नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: gulabrao patil slams shivsena uddhav thackeray Over Political situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.