गुरु गोरक्षनाथ यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:11 PM2020-01-27T12:11:26+5:302020-01-27T12:16:29+5:30
डाबली-धांदरणे येथे जय्यत तयारी । १५ ते २० गावातील भाविकांची नवस फेडण्यासाठी होते मोठी गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क
धांदरणे : शिंदखेडा तालुक्यातील डाबली-धांदरणे येथे गुरु गोरक्षनाथ यात्रोत्सवाला २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.
यात्रेनिमित्त पहाटे मंदिरात विधीवत पूजन व महाआरती होईल. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होईल. तसेच तगतराव मिरवणूक काढण्यात येणार आहे. मनोरंजनासाठी नथ्थूभाऊ भोकरकर, शालीक शांताराम यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. हे मंदिर प्राचीन असून डाबली-धांदरणे गावापासून ४ किलोमीटर अंतरावर नरडाणा रस्त्यालगत आहे. परिसरात या यात्रोत्सवाला ‘बल्लानी जत्रा’ म्हणून संबोधले जाते.
गुरु गोरक्षनाथ यात्रेचे नियोजन मंदिराचे अध्यक्ष लक्ष्मण हरचंद पाटील, सचिव दगडू लक्ष्मण सोनवणे व नियोजक आर.एल. सोनवणे यांच्या नियोजनात यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.
यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात मान-मानता, तसेच भजन, पालखी सोहळा, लोकनाट्य कार्यक्रम, पायी दिंडी यात्रा असे अनेक विविध कार्यक्रम होत असतात. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी यात्रोत्सव परिसरात पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
या यात्रोत्सवाला परिसरातील १५ ते २० गावातील भाविक मोठ्या संख्येने गुरु गोरक्षनाथ यांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.