जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात ७४ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 10:36 PM2020-09-06T22:36:36+5:302020-09-06T22:37:06+5:30
३० जणांना केली अटक : मध्यप्रदेशासह गुजरातकडून येणाऱ्या मालावर पोलिसांचा राहणार ‘वॉच’, गुटख्याची तस्करी रोखण्याचा होतोय प्रयत्न
धुळे : मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून महाराष्टÑात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जातो. गत आठ महिन्यात धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनअंतर्गत गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून, तब्बल ७४ लाख ५७ हजार ४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी ३० संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुटख्याचा नेमका साठा येतो कुठून, आणि त्याची विल्हेवाट कुठे लावली जाते, याचा शोध गांभिर्याने घेण्याची गरज आहे़
महाराष्टÑात गुटख्यावर बंदी आहे. धुळे जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने, या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असते. छुप्या मार्गाने येणारा हा गुटखा कधी ट्रकमध्ये तर कधी छोट्या वाहनांतून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या़ गेल्या आठ महिन्यात धुळे शहर पोलीस ठाणे, आझादनगर पोलीस ठाणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, देवपूर पोलीस ठाणे, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे तालुका, सोनगीर, पिंपळनेर, शिरपूर शहर, शिरपूर तालुका, नरडाणा, दोंडाईचा अशा विविध पोलीस ठाण्यातंर्गत गुटखा हस्तगत करण्यात आला आहे़
गुजरात आणि मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा गुटखा हा प्रामुख्याने ट्रकमधून येत असलातरी त्यात अन्य साहित्य ठेवून लपवून आणला जात आहे़ हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर येणारे वाहन तपासणी करण्याची सुध्दा बहुतेकवेळा मर्यादा पोलिसांना येत आहे़ त्याचाच गैरफायदा गुटखा तस्करी करणारे उचलत असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिरपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या कारवाईत तर ट्रकमध्ये डाळ भरलेली होती़ चालकाने ट्रक थांबवून केवळ डाळ असल्याचा बनाव केला होता़ पण, पोलिसांना मिळणारी माहितीत सत्यता असल्यामुळे गुटख्याची होणारी तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले़ काहीवेळेस तर ट्रकांची तपासणी करुन देखील त्यात गुटखा आढळून येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ तर गुटख्याचा माल काहीवेळेस अंधाराचा फायदा घेऊन जिल्ह्यात आणला गेला असेल तर तो दडवून ठेवल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़ दोनच दिवसांपुर्वी धुळे तालुक्यातील मोरदडतांडा रेल्वे क्रॉसिंग ते तरवाडे गावाकडे जाणाºया रस्त्यालगत असलेल्या काही गाळ्यांमध्ये गुटखा दडवून ठेवला असल्याचे कळताच गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्याचा हा मुद्देमाल तब्बल १० लाखांचा होता़
दरम्यान, जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातंर्गत झालेल्या या कारवाईत तब्बल ३० जणांना जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे़ त्यांच्याकडून एकत्रित ७४ लाख ५७ हजार ४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़
मूळ माफियांपर्यंत़़़!
गुटखाबंदी कायदा लागू झाल्यापासून सर्रास गुटखा विक्री छुुप्या रितीने होत आहे़ पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई होते़ मोठा साठा पकडला जातो़ गुन्हाही दाखल होतो़ परंतु गुटख्याच्या या गोरखधंद्यात मुळ माफियांपर्यंत पोलिसांचा तपास कधी पोहचेल? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो़