गुजरातेतून गुटखा आला, सापळा लावून पकडला!
By देवेंद्र पाठक | Published: February 6, 2024 05:38 PM2024-02-06T17:38:28+5:302024-02-06T17:39:33+5:30
वाहनासह १२ लाखांचा मुद्देमाल, दोघांविराेधात गुन्हा.
देवेंद्र पाठक,धुळे : गुजरात राज्यातून ट्रकमधून छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात दाखल होणारा गुटखा पिंपळनेरनजीक पकडण्यात पोलिसांना यश आले. १ लाख ८० हजारांचा गुटखा आणि १० लाखांचा ट्रक, असा ११ लाख ८० हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली असून, सोमवारी सायंकाळी मालेगाव येथील दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गुजरात राज्यातून छुप्या पद्धतीने गुटखा, विमल पानमसाला असा साठा ट्रकमधून महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. माहिती मिळताच पिंपळनेर ते कुडाशी रस्त्यावरील हॉटेल मराठा दरबारजवळ पोलिसांनी सापळा लावला होता. वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच १४ बीजे ०३२८ क्रमांकाचा ट्रक थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांना संशय आला. परिणामी ट्रकची तपासणी केली असता त्यात विमल पानमसाला, तंबाखू असा १ लाख ८० हजार ७७८ रुपयांचा साठा आणि १० लाखांचा ट्रक, असा एकूण ११ लाख ८० हजार ७७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार अफजल अहमद मोहम्मद शफिक (वय ३२) आणि मुक्तार अहमद मजूर अहमद (वय ४२) (दाेन्ही रा. मालेगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी करीत आहेत.