खासगी बसमधून होणारी गुटख्याची तस्करी पोलिसांनी पकडली, पुण्याच्या प्रवाशाला अटक
By देवेंद्र पाठक | Published: September 25, 2023 04:36 PM2023-09-25T16:36:26+5:302023-09-25T16:36:58+5:30
इंदूर येथून पुण्याच्या दिशेने एम.पी. ३०, पी. ७७७० क्रमांकाची खासगी बस जात आहे.
धुळे : इंदूरहून मालेगावकडे जाणाऱ्या खासगी बसमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला धुळे तालुका पोलिसांनी पकडले. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ रविवारी केली. अभिषेक सूर्यप्रकाश शुक्ला (वय २३, रा. गुलमोहोर काॅलनी, लोहगाव, पुणे) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव असून, त्याच्याजवळून दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
इंदूर येथून पुण्याच्या दिशेने एम.पी. ३०, पी. ७७७० क्रमांकाची खासगी बस जात आहे. या बसमधून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच आर्वी दूरक्षेत्रासमोर तालुका पोलिसांनी नाकाबंदी केली. धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसची तपासणी सुरू केली. त्यावेळी संशयित अभिषेक सूर्यप्रकाश शुक्ला (वय २३,) या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्याकडे गुुटख्याचा साठा आढळून आला.
ताब्यात घेऊन चौकशी केली असता इंदूर येथून गुटखा खरेदी करून पुणे येथे विक्री करण्यासाठी वाहनात घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १ लाख ५२ हजार २२४ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रविवारी सायंकाळी उशिरा तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक प्रमाेद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.