धुळे : दुचाकीवरून गुटख्याची तस्करी, आर्वीच्या इसमाला अटक एलसीबीची कारवाई; १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Published: April 10, 2023 06:08 PM2023-04-10T18:08:21+5:302023-04-10T18:08:33+5:30
याप्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
धुळे : दुचाकीवरून गुटख्याची तस्करी करणाऱ्या धुळे तालुक्यातील आर्वी येथील एकाला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्याच्याकडून १ लाख १६ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दिनेश बारकू पाटकर (वय ३८, रा. सीताराम चौक, आर्वी) याला अटक करण्यात आली. एक जण दुचाकीवरून गुटख्याची तस्करी करीत जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील लामकानी शिवारात रविवारी दुपारी सापळा लावण्यात आला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमएच १८ एबी ६८२९ क्रमांकाच्या दुचाकीने एक जण गुटख्याच्या पुड्या घेऊन येत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता ९६ हजार १२८ रुपये किमतीचा गुटखा आणि २० हजारांची दुचाकी असा एकूण १ लाख १६ हजार १२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हेडकॉन्स्टेबल संतोष हिरे, संदीप पाटील, कर्मचारी पंकज खैरमोडे, महेश मराठे, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ यांनी ही कारवाई केली.