आर्मीचे नाव वापरुन गुटख्याची तस्करी; एनसीबीच्या कारवाईत १४ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 07:44 PM2023-06-12T19:44:00+5:302023-06-12T19:44:21+5:30
या कारवाईत जवळपास १४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
दिल्लीहून कोचीच्या दिशेने होणारी तंबाखूची वाहतूक धुळे एनसीबीच्या रोखली आहे. काल गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाल्याने दुपारच्या सुमारास सापळा रचून आयशर वाहन पकडण्यात आले. कहर म्हणजे वाहनावर 'ऑन आर्मी ड्युटी' असे लिहिलेले होते. परंतु, एनसीबीच्या पक्की खबर असल्याने तंबाखुचा साठा जप्त करण्यात यश मिळविले. या कारवाईत जवळपास १४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
मुंबई- आग्रा महामार्गावरुन वाहन धुळ्याकडे येत होते. यासंदर्भात एनसीबीच्या खबर मिळाल्याने काल दुपारच्या सुमारास संशयित वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे पकडण्यात आले. यावेळी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने वाहनात लोखंडी चॅनेलचे गेट असल्याचे सांगितले. परंतु, गाडीची तपासणी केली असता त्यात लोखंडी चॅनेलच्या आड तंबाखूचा लाखो रुपयांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला.
या कारवाईत १ लाख ८० हजार किंमतीचा तंबाखू, ८० हजारांचे लोखंडी चॅनेलचे ट्रे आणि १० लाखांचे आयशर वाहन असा १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी वाहनचालक बबलू रामप्रकाश प्रजापती याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने हा माल कुणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होता याचा तपास आता धुळे पोलिस करीत आहेत.