ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला, ट्रकचालक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:36 PM2023-02-28T19:36:48+5:302023-02-28T19:37:46+5:30
शिरपूर तालुक्यात हाडाखेड गावात ट्रकसह २७ लाख ८५ हजारांचा गुटखा पकडला असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र शर्मा
शिरपूर (धुळे) : तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी दुपारी १ वाजता हाडाखेड गावाजवळील एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली. तेव्हा १७ लाख ८५ हजारांचा गुटखा आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण २७ हजार ८५ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. राज्य अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक रिजवान इसरार शेख (३६, रा.इंदूर) यास अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी दुपारी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप एम. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्य प्रदेशाकडून शिरपूरमार्गे मुंबईला पानमसाला व सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याची वाहतूक होत आहे. पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हाडाखेड गावाच्या शिवारात लालमातीजवळ असलेल्या हॉटेल विकासजवळ डीडी ०१ जे ९२४९ क्रमांकाचे ट्रक आढळून आले.
पोलिसांना चालक रिजवान इसरार शेख (३६, वर्षे, रा. नूर मशिदजवळ, खजराना, इंदूर) याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर वाहनाची तपासणी केली असता ९ लाख ७२ हजाराचा शुद्ध प्लस पानमसाला, ५ लाख ५ हजार ४४० रुपये किमतीची नवी ब्यूबिंग तंबाखू, ३ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचा एसएचके पानमसाला आणि १० लाख किमतीचे वाहन असा एकूण २७ लाख ८५ हजार २४० रुपये किमतीचा साठा मिळून आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक रिजवान इसरार शेख यांना अटक करण्यात आली आहे.