शेंदवडजवळ दोन वाहनांसह ४२ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: December 23, 2023 04:41 PM2023-12-23T16:41:47+5:302023-12-23T16:42:30+5:30
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र पाठक,धुळे : गुजरातकडून साक्रीमार्गे येणारी गुटख्याची दोन वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदवड गावाजवळ पकडली. कार आणि पिकअप वाहनासह ४१ लाख ५५ हजार ९२० रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पथक उपस्थित होते. गुजरात राज्यातील अहवा येथून वाहनाच्या माध्यमातून गुटखा हा साक्रीकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यातील शेंदवड गावाजवळ सापळा लावला.
वाहनाची तपासणी करत असताना पिकअप व्हॅन (एमएच ४१ एजी २४७२) आणि कार (एमएच २४ एएफ ०४९३) एकापाठोपाठ एक आल्याने दोन्ही वाहनांना अडविण्यात आले. चालकाकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली. वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात लपविलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी पंकज कैलास भोई (वय ३१, रा. वृंदावननगर, पिंपळनेर, ता. साक्री) आणि रामजतन अवधराम प्रजापती (वय १९, रा. महात्मा फुले कॉलनी, पिंपळनेर, ता. साक्री) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी हा गुटख्याचा माल कुठून आणला, कुठे विकणार होते याची चौकशी केली जात आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांंत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, दिलीप खोंडे, कर्मचारी संतोष हिरे, पंकज खैरमोडे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ यांनी ही कारवाई केली.