साडेअकरा लाखांचा गुटखा जप्त, चालकाला अटक, शिरपूर पोलिसांची हाडाखेडनाक्यावर कारवाई
By अतुल जोशी | Published: January 19, 2024 06:48 PM2024-01-19T18:48:08+5:302024-01-19T18:48:27+5:30
धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ११ लाख ७९ हजार३८६ रूपयांचा गुटखा व ८ लाखांचा ट्रक असा ...
धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ११ लाख ७९ हजार३८६ रूपयांचा गुटखा व ८ लाखांचा ट्रक असा एकूण १९ लाख ७० हजार ३८६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्याजवळ करण्यात आली. याप्रकरणी आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे.
सेंधवा (मध्यप्रदेश) येथून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकमधून (क्र. डीडी ०१-जी ९२४२)महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हाडाखेड तपासणी नाक्याजवळ शुक्रवारी सकाळी सापळा लावला. संशयित वाहन येताच पोलिसांनी ते अडविले. चालकाला वाहनात काय आहे, याची विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर चालकाच्या संमतीने वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात विविध कंपनीचा ११ लाख ७० हजार ३८६ रूपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून, चालक धर्मेंद्र सजन राव (वय ३१, रा.पोलाय, जि.देवास,म.प्र) याला अटक करण्यात आली.