कारमधून मालेगावकडे जाणारा अडीच लाखांचा गुटखा जप्त
By देवेंद्र पाठक | Published: July 25, 2023 09:56 PM2023-07-25T21:56:29+5:302023-07-25T21:57:04+5:30
आर्वी शिवारात तालुका पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत
देवेंद्र पाठक, धुळे: धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून अडीच लाखांचा गुटखा तालुका पोलिसांनी आर्वी शिवारात पकडला. अडीच लाखांच्या गुटखासह ३ लाख ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. कारचालक विजय भालचंद्र सोंजे (वय २६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पुरवठादार सनी टेकचंद पंजाबी (वय ३६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचे नाव समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली.
एका कारमधून गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात साेमवारी सकाळी सापळा लावण्यात आला. कार (क्रमांक एमएच- १५, एएच- ८९६०) येताच अडविण्यात आली. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारचालक विजय भालचंद्र सोंजे (वय २६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याला अटक केली. गुटख्याबाबत अधिक चौकशी केली असता पुरवठादार सनी टेकचंद पंजाबी (वय ३६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचे नाव समोर आले. संशयित विजय सोंजे याच्या कबुलीवरून सनी पंजाबी याला मंगळवारी पहाटे पावणेसहा वाजता अटक करण्यात आली आहे. गुटख्यासह कार असा एकूण ३ लाख ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकातील महादेव गुट्टे, रवींद्र राजपूत, कुणाल पानपाटील, उमेश पवार, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, विशाल पाटील यांनी केली.