गावात गटारी तुंबल्या, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:47+5:302021-05-24T04:34:47+5:30
कोरोनामुळे मालपूर अगोदरच हाॅटस्पाट बनले होते. मात्र, हळूहळू लाट ओसरू लागली आहे. यामुळे थोडा दिलासा मिळाला. यातच दुसरीकडे ...
कोरोनामुळे मालपूर अगोदरच हाॅटस्पाट बनले होते. मात्र, हळूहळू लाट ओसरू लागली आहे. यामुळे थोडा दिलासा मिळाला. यातच दुसरीकडे गावातील काही बालकांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावरून पालक वर्गात चर्चा आहे. गावात गटारीत पाणी ठिकठिकाणी साचलेले आहे. यामुळे डेंग्यू व इतर आजार वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावाच्या पश्चिम दरवाजा असलेला घाटावर तर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथून जाणे-येणे अप्रत्यक्ष बंद झाले आहे. हा गावाचा जुना मार्ग असून आजही गावकऱ्यांची येथे मोठी वर्दळ असते. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर वाॅर्ड क्रमांक दोन व तीनमधील नागरिक या मार्गाने घराकडे परतत असतात. येथे सध्या चालणे देखील मुश्कील झाले आहे. प्रत्येक वाॅर्डातील गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. यामुळे यातील पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यातच वाॅर्ड क्रमांक एकमधील कुंभार गल्ली तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी परिसरातील गटारींची दयनीय अवस्था झाली असून येथे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाॅर्ड क्रमांक चारमधील अमरावती नदी किनारपट्टीवर देखील प्रचंड घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. वाॅर्ड क्रमांक चार व पाचच्या सीमारेषा गल्लीत तर दिवसरात्र या मार्गावरून गटारीतील पाणी वाहत असते. हा गावाचा मुख्य प्रमुख मार्ग आहे. या प्रमुख मार्गावरूनच गटारीतील पाणी सुमारे महिनाभरापासून वाहत असून, त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये जिल्हा परिषद शाळा कमांक तीन जवळपास व गल्लीतदेखील अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने युद्धपातळीवर साफसफाई मोहीम हाती घेऊन गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मालपूरकरांची मागणी आहे.