कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे दीडशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:43 PM2020-08-14T12:43:43+5:302020-08-14T12:45:08+5:30
जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत १५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आॅगस्ट महिन्याच्या १२ दिवसातच ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ४८५० इतकी झाली आहे. तर ३३०९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. १० एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. साक्री येथील ५३ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच एप्रिल महिन्यातच धुळे शहरातील मछीबाजार व तिरंगा चौक परिसरातील लोकप्रतिनिधीच्या भावाचा मृत्यू झाला होता.
धुळे शहरातील ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित जिल्ह्यातील ७४ रुग्ण दगावले आहेत. त्यात शिरपूर तालुक्यातील ३० रुग्णांचा समावेश आहे.
१ ते ७ आॅगस्ट दरम्यान ३२ रुग्ण दगावले... १ ते ७ आॅगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सात दिवसांच्या कालावधीत तब्बल ३२ रुग्ण दगावले आहेत. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा कहर अधिकच तीव्र झाला आहे. एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आॅगस्ट महिन्यात आढळले आहेत. ८ आॅगस्ट रोजी १६८ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण ११ आॅगस्ट रोजी आढळले. ११ रोजी तब्बल २२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर १२ आॅगस्ट रोजी १६४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान १२ ते १८ जून या कालावधीत देखील १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.