हल्ल्याचा दीड मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:29 AM2017-07-20T00:29:36+5:302017-07-20T00:29:36+5:30
गुड्ड्या खून प्रकरण : तलवारीने सपासप वार करून तरुण फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याला मंगळवारी पहाटे चहाच्या दुकानाबाहेर खेचून आणले. १० ते १५ जणांच्या टोळीने निर्दयतेने तलवारीने सपासप वार करून अवघ्या दीड मिनिटातच त्याला निष्प्राण केले. या वेळी रस्त्यावरून वर्दळ सुरू असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमधून स्पष्ट दिसते. ही क्लिप पाहिल्यावर मनाचा थरकाप उडतो.
बुधवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास व्यायाम केल्यानंतर गुड्ड्या हा नेहमीप्रमाणे पारोळा रोडवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी आला असता, त्या ठिकाणी आधीच त्याची वाट पाहात बसलेल्या काही संशयितांशी त्याचा कुठल्यातरी विषयावरून वाद झाला असावा. त्यानंतर थोड्याच वेळात संशयितांपैकी एक जण हॉटेलच्या बाजूच्या ओट्यावर ठेवलेले पाणी फेकून बाहेर निघाला. तेव्हा त्या ठिकाणी आजूबाजूला दबा धरून बसलेले अन्य १० ते १२ जण हातात तलवारी घेऊन तेथे धावत आले. त्यांनी गुड्ड्यावर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. वार करणाºया तरुणांपैकी एकाने खाली पडलेल्या गुड्ड्याला अक्षरश: पायरीवरून ओढत बाहेर आणले. आणि रस्त्यावर तो ज्या स्कुटरवर आला होता, त्या स्कुटरच्या बाजूलाच जमिनीवर गुड्ड्याच्या गळ्यावर आणि तोंडावर तलवारीने अक्षरश: निर्दयतेने सपासप वार करण्यास सुरुवात केली. वार इतक्या निर्दयपणे करण्यात येत होते की, ते पाहून अंगाला शहारे येतील. गुड्ड्यावर एका तरुणाने तर तलवारीने सुमारे २१ वार केले. गुड्ड्याचे शरीर निष्प्राण झाल्यानंतरही तो तरुण वार करीतच होता. त्याला त्याच्या एका साथीदाराने ओढत नेले, तरी तो एकदा परत आला आणि पुन्हा गुड्ड्यावर तलवारीने वार केले. वार इतक्या ताकदीने करण्यात आले होते की, त्याची तलवारसुद्धा वाकली होती. गुड्ड्या पूर्णपणे निष्प्राण झाल्याची खात्री झाल्यानंतर तो तेथून पसार झाला.
दीड मिनिटाचा थरार
हा थरार दीड मिनिट सुरू होता. शेवटी जेव्हा तो तरुण तलवारीने सपासप वार करीत होता, तेव्हा तेथून एक लाल रंगाची गाडी गेल्याचे दिसते. संपूर्ण दीड मिनिटाची ही व्हिडिओ क्लिप बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रत्येक चौकात ही क्लिप एकत्रपणे बघताना तरुण दिसत होते. क्लिप वेगाने संपूर्ण शहरातच व्हायरल झाली. त्यानंतर अनेक जण ही क्लिप कोणाला पाठवू नका, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा, असे मॅसेजही टाकत होते.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, शहरातील शांतता अबाधित ठेवावी. पोलिसांवर विश्वास ठेवावा. लवकरच सर्व हल्लेखोरांना अटक करण्यात येईल. त्यांच्याविरोधात कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता अबाधित ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
-एम.रामकुमार
जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे