पाण्यासाठी महापालिकेवर काढला हंडा मोर्चा; संतप्त महिलांनी माठ फोडून केला भाजपचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 05:23 PM2023-06-20T17:23:26+5:302023-06-20T17:26:36+5:30
सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडण्यात आले.
धुळे शहरात दहा ते बारा दिवस नळांना पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांच्यावतीने धुळे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात शहरातील महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत धुळे महानगरपालिकेवर हा हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडण्यात आले.
धुळे शहरात दहा ते बारा दिवस नळांना पाणी येत नाही. जे येते तेही अत्यंत अशुद्ध, गढूळ व गाळमिश्रित पाणी असते, मात्र नाईलाजाने ह्याच पाण्याचा थेंब न थेंब साठवून धुळेकर जनता आपल्या घशाची कशीबशी कोरड भागवीत आहे. काहींना तेही मिळत नसल्याने त्यांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अक्कलपाडा योजनेचे पाणी आज मिळेल उद्या मिळेल, अशी खासदार डॉ. सुभाष भामरे व मनपातील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या वतीने भूलथापा देण्यात येत आहेत.
या विरोधात संतप्त झालेल्या धुळे शहरातील नागरिकांच्या वतीने आज धुळे महानगपालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी धुळे महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडून सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. पुढील येत्या आठ दिवसाच्या आत संपूर्ण धुळे शहराला एका दिवसाआड पाणी दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.