पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस
By admin | Published: April 17, 2017 01:03 PM2017-04-17T13:03:40+5:302017-04-17T13:03:40+5:30
पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही
प्रणव कुमार : जळगावातून सुरुवात
ऑनलाईन लोकमत/गणेश वाघ
भुसावळ, जि. जळगाव, दि. 17- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत टपाल खात्यानेही कात टाकली असून पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस (ग्रामीण माहिती संप्रेक्षण प्रणाली) दिसणार आह़े पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, पोस्टमनच त्यांच्या दारी पोहोचणार असल्याची माहिती औरगांबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल प्रणव कुमार यांनी येथे दिली़
आगामी दोन महिन्यात जळगावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली़ पुण्यात या पद्धत्तीचा अवलंब करण्यात आला आह़े
औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँक
ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी टपाल खात्यातर्फे नवनवीन योजना अंमलात आणल्या जात आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँक लवकरच सुरू होत आह़े इतर बँकांप्रमाणे सर्व सुविधा या बँकेत उपलब्ध असल्यातरी तूर्त कर्ज या बँकेतून उपलब्ध होणार नाही मात्र सर्व बँकांशी ही बँक कनेक्ट असेल़
जळगाव पोस्टातून मिळणार पासपोर्ट
पासपोर्ट वाटपाची क्लिष्ट प्रक्रिया अत्यंत सोपी झाली असून औरंगाबाद येथे प्रतिदिन शंभर अर्ज पासपोर्ट संदर्भात भरले जात आहेत़ आगामी दोन महिन्यात जळगावातून टपाल कार्यालयामधून नागरिकांना पासपोर्टचे वितरण होईल, असेही प्रणव कुमार म्हणाल़े विशेष म्हणजे पासपोर्ट व्हेरिफिकेशन टपाल खात्याचा अधिकारी करणार आह़े केंद्राने ही जबाबदारी टपाल खात्यावर सोपवली आह़े टपाल कार्यालयातून एम्प्लायमेंट सुविधादेखील लवकरच सुरू होणार आह़े