शेतात केलेले कष्ट कोरोनाच्या लढाईत आले कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:34 AM2021-05-01T04:34:00+5:302021-05-01T04:34:00+5:30
धुळे : कोरोना शरीरासोबतच मनाचीही परीक्षा घेतो आहे. कोरोना विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यभर शेतात ...
धुळे : कोरोना शरीरासोबतच मनाचीही परीक्षा घेतो आहे. कोरोना विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी धैर्य आणि संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यभर शेतात कष्ट उपसल्यामुळे संयमाची परीक्षा नवीन नव्हती. त्यामुळेच कोरोनावर मात करू शकलो, अशी भावना शिंदखेडा तालुक्यातील हातनूर येथील ६४ वर्षीय खंडू उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.
खंडू पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर १७ एप्रिल रोजी ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आयुष्यभर शेतात राबल्याने, कष्ट करण्याची सवय असल्याने त्यांची इच्छाशक्ती चांगली होती तसेच चांगले उपचार मिळाल्याने ते लवकर बरे होऊ शकले, अशी माहिती खंडू पाटील यांचे चिरंजीव मनोज यांनी दिली.
खंडू पाटील यांना कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला, ते समजले नाही. मात्र, सलग चार ते पाच दिवस खोकला व ताप येत होता. त्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. मात्र, खोकला कमी होत नसल्याने त्यांनी कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. ९ एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
सिटी स्कॅनचा स्कोर होता नऊ -
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सिटीस्कॅन केले असता, त्यांचा स्कोर नऊ इतका होता, तसेच ऑक्सिजनची पातळी ९३ पर्यंत खाली आली होती, तसेच त्यांना अस्थमा असल्याने धोका जास्त होता. मात्र, तत्काळ उपचारांना सुरुवात केल्याने व औषधे उपलब्ध झाल्याने कोरोनावर विजय मिळवण्यात ते यशस्वी झाले.
समाजाचा दृष्टिकोन महत्त्वाचा -
कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाजाचा रुग्णाबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, ते महत्त्वाचे असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. कठीण काळात परिवाराने धीर दिल्याने वडिलांची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत झाली. आजारपणात असताना रुग्णाशी इतर लोक कसे वागतात, ते जास्त महत्त्वाचे असते. कोरोना हा वेगळा आजार नाही, अशा पद्धतीने वागलो तर रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते, असेही त्यांनी सांगितले.
खासगी नव्हे, जिल्हा रुग्णालयात मिळाले इंजेक्शन -
खंडू पाटील यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी रेमडेसिविर व अन्य औषधांची गरज असून, ते आणण्यास रुग्णालयाकडून सांगण्यात आले. इंजेक्शनसाठी खूप धावाधाव केल्यानंतरही ते मिळत नसल्याने मनोज हतबल झाले होते. शेवटी त्यांनी साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालय गाठले व तेथील डॉक्टरांसमोर आपली कैफियत मांडली. जिल्हा शल्य चिकित्सक महेश भडांगे, आरोग्य अधिकारी अश्विनी भामरे यांनी पुरेसे औषध उपलब्ध असून, रुग्णाला घेऊन येण्यास सांगितले. खासगी रुग्णालयापेक्षाही अधिक चांगली सेवा जिल्हा रुग्णालयात मिळाल्याचे त्यांनी सांगितले.