हार्डवेअरचे दुकान फोडले, ६०हजारांचे नुसते ‘नळ’च लंपास केले; मध्यरात्री चोरीचा गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Published: November 19, 2023 05:36 PM2023-11-19T17:36:18+5:302023-11-19T17:39:23+5:30
चोरीची ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
धुळे : शिरपूर येथील हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्याने कोणत्याही वस्तूला हात न लावता केवळ ६० हजार रुपये किमतीचे स्टिलचे नळ चोरून नेणे पसंत केल्याचे घटनेवरून समोर आले. चोरीची ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याने केवळ नळ चोरून नेले. दुसरे काहीच नेले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील प्रदीप किशोर शिरसाठ (वय ३०) या तरुण व्यापाऱ्याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार शिरपूर शहरात क्रिएशन गार्डनजवळील बजरंग नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने हातसफाई केली. चोरट्याने दुकानाचे पत्रटी शेडचे मागील पत्रा उचकवून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. दुकानात विविध प्रकारचे हार्डवेअरचे साहित्य असताना चोरट्यने कोणत्याही वस्तूला हात न लावता केवळ स्टीलचे नळ लंपास केल्याचे समोर आले आहे. चोरी झालेल्या नळाची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे. चोरीची ही घटना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकानाच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यानंतर नेमके काय चोरीला गेले हे लक्षात आल्यानंतर प्रदीप शिरसाठ यांनी शिरपूर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री भादंवि कलम ४६१, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक रवींद्र आखडमल करीत आहे.