धुळ्यातील रेल्वेस्टेशन भागातील अतिक्रमणावर अखेर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:16 PM2017-10-26T13:16:12+5:302017-10-26T13:18:14+5:30
स्थानिकांनी केला विरोध, रहिवाशांचे साहित्य रस्त्यावर, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
आॅनलाईन लोकमत
धुळे : शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील अतिक्रमण काढण्यास गुरूवारी सकाळी ६ वाजेपासून सुरूवात झाली़ पहिल्या टप्प्यात फाशी पूल ते रेल्वेस्टेशन रोडपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले़ पाच जेसीबींच्या सहाय्याने निवासी अतिक्रमण काढण्यात येत होते़ अतिक्रमण काढत असतांना, काहींनी विरोध केला. मात्र प्रचंड पोलिसांच्या फौजफाट्यात ही कारवाई सुरूच होती. दरम्यान अनेक वर्षांपूर्वीची स्वत:ची पडणारी घरे पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते़
शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने आधीच जाहीर केल्यानुसार गुरूवारी सकाळपासून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरूवात केली़ स्थानिकांनी सुरूवातीलाही काहीसा विरोध केला़ मात्र पाच जेसीबींसह घंटागाड्या, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, क्रेन, रूग्णवाहिका, मालवाहू वाहने, अधिकाºयांच्या वाहनांसह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी घरातील सामान रस्त्यावर आणून ठेवत घरे रिकामी करण्यास सुरूवात केली व त्यानंतर घरे जेसीबीने पाडण्यात येत होती़
रेल्वेस्टेशन ते दसेरा मैदान या टप्प्यातील अतिक्रमणधारकांनी सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण हटविण्यास विरोध सुरू केला होता़ त्यासाठी स्टेशनरोडजवळ महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. मात्र पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर पोलीसांनी विरोध करणाºया महिला व पुरूषांना ताब्यात घेतले़ त्यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ अनेक वर्षांपूर्वीची घरे डोळ्यादेखत भुईसपाट होत असतांना महिलांना अश्रू अनावर झाले होते़ परंतु पोलीसांनी विरोध मोडून काढल्यानंतर पुढील कारवाई बंदोबस्तात सुरू करण्यात आली़ अतिक्रमणधारकांनीही स्वत:हून घरे रिकामी करण्यास सुरूवात केली़ ही कारवाई रात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले़ या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरोडवरील वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता़ महावितरणच्या कर्मचाºयांनी घरांचे वीजमीटर काढून घेतले़ सद्यस्थितीत तणाव निवळला असून शांततेत कारवाई सुरू आहे़ या परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याची रूंदी वाढविली जाणार आहे़