जिल्ह्यातील डिजीटल शाळांच्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:00 PM2019-01-01T22:00:46+5:302019-01-01T22:01:47+5:30
हर्षल विभांडीक : विद्यार्थ्यांशी संवाद साधणार मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : डिजीटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डिजीटल शाळा उपक्रमाची माहिती दिली़ दिल्ली येथील ‘एनसीपीसीआर’ ने केलेल्या ‘इम्पॅक्ट अॅनालिसीस’ अहवालाची माहिती दिली़
जिल्ह्यातील डिजीटल शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षकांची एक फळी तयार झाली आहे़ डिजीटल वर्गाच्या माध्यमातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात़ देश विदेशातील शिक्षक व शिक्षकतज्ज्ञ आता डिजीटल वर्गाव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार आहेत़ या उपक्रमाची सुरूवात ५ जानेवारी पासून होत असून त्याची पूर्वतयारी म्हणून दिवाळीच्या सुट्यांमध्ये जि़प़ शाळांच्या शिक्षकांना ‘इंग्लीश स्पिकींग’चे प्रशिक्षण देण्यात आले़ त्यात त्यांना शाळेची, गावाची व विद्यार्थ्यांची ओळख इंग्रजीत कशी करून द्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले़ आता आठवड्यातून २ दिवस जिल्ह्यातील जि़प़ शाळा डिजीटल वर्गांच्या माध्यमातून अमेरिकेतील शिक्षकांशी जोडल्या जाणार आहेत़ मुख्यमंत्र्यांनी देखील या उपक्रमाचे अभिनंदन केले़ मुख्यमंत्री लवकरच धुळयातील सर्व जि़प़ शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत़