‘तो’ धोकेदायक स्लॅब काढला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:38 PM2019-10-26T12:38:14+5:302019-10-26T12:38:56+5:30
मनपा : अन्य शाळांच्या दुरूस्तीचीही गरज
धुळे : पुणे शहरातील कोंढवा शाळेची भिंत कोसळून प्राणहाणी झाली होती़ या पार्श्वभूमीवर धुळ्यातील मनपाच्या उर्दू शाळेचा धोकेदायक स्लॅब पडून दुर्घटना घडू शकते़, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते़ त्याची दखल घेत तत्काळ हा स्लॅब काढण्यात आला
शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते़ मनपाच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी मनपा शिक्षण मंडळाकडून वेळावेळी महापालिकेकडे बजेट सादर करण्यात येतो. मात्र तरी देखील शाळांची स्थितीत बदल होऊ शकत नसल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़
आठवड्याभरापासून रिमझिम सुरू असलेल्या मनपा शाळा गळू लागल्या आहेत़ अनेक शाळा दुरुस्तीअभावी कशाबशा तग धरून उभ्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळा विविध समस्यांनी ग्रासल्या आहेत.
जीवघेणा स्लॅब काढला
शहरातील भंगार बाजारातील मनपाच्या उर्दू शाळेच्या इमारतीला लागून असलेला जीर्ण स्लॅबवरून विद्यार्थी सुटीमध्ये फिरतात़ त्यामुळे दोन विद्यार्थी त्यावरून पडून जखमी झाल्याची घटना देखील घडली होती़ जीर्ण व धोकेदायक स्लॅबमुळे दुर्घटना घडू शकते़
‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिध्द केल्यानंतर शाळेच्या इमारतीचा स्लॅब तत्काळ काढण्यात आला आहे़
शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी टाकी बांधण्यात आली आहे़ मात्र टाकीचे नळ चोरीला गेल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती़ मात्र आता स्वच्छतागृहासह इतर समस्या प्रशासनाने मार्गी लावल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.