कढरे ते आगरपाडा रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:19 PM2019-04-12T17:19:06+5:302019-04-12T17:19:40+5:30
साक्री तालुका : ठेलारी समाजबांधवांची प्रतिक्षा कायम
बळसाणे : साक्री तालुक्यातील ठेलारी बांधवांच्या पाड्यात जाण्या-येण्यासाठी पक्के रस्ते नाही पावसाळ्यात तर आगरपाडाकरांचा संपर्कच तुटतो. कढरे ते आगरपाडा व बळसाणे ते आगरपाडा रस्त्याचे काम कधी झालेच नाही. वर्षानुवर्ष या रस्त्याच्या कामाकडे कोणी लक्षच दिले नसल्याने ठेलारी समाजबांधवांना रस्ता तयार होण्याची प्रतिक्षा कायम आहे.
बळसाणे गावापासून काही अंतरावर च आगरपाडा गाव वसले आहे या वाड्यावरील ठेलारी बांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असून येथे महामंडळाची बस ही जात नाही. कढरे पासून ते आगरपाडा गावाकरिता रस्ता बनविण्यात अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढून गावापर्यंत रस्ता तयार होईल असे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
तसे प्रयत्न अद्याप कोणीही केलेले नसल्याने गावाकडे जातांना ग्रामस्थांना पायवाटेतून तयार झालेल्या रस्त्यावरुन जावे लागते. पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल निर्माण होते. त्यामुळे यावरुन पायी चालणे देखील कठीण होत असते.
जास्त पाऊस झाला तर आगरपाडाचा संपर्क देखील तुटतो, अशी परिस्थिती आहे.