टवाळखोरांमुळे वाढली ‘डोकेदुखी’
By admin | Published: January 13, 2017 12:17 AM2017-01-13T00:17:53+5:302017-01-13T00:17:53+5:30
टवाळखोर विद्यार्थी गोंधळ घालत असल्याने शाळा-महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडत आह़े
शिरपूर : शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालय आवारात व बाहेर काही टवाळखोर विद्यार्थी गोंधळ घालत असल्याने शाळा-महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडत आह़े त्यामुळे महाविद्यालयांसाठी टवाळखोरांमुळे डोकेदुखी ठरत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी करण्यात आली होती़ शाळा-कॉलेज परिसर, करवंद व निमझरी नाका परिसरात साध्या गणवेषात पोलीस पथक अशा टवाळखोरांवर नजर ठेवून आहेत़ पोलिसांनी चौघा विद्याथ्र्यावर नुकतीच कारवाईही केली आहे.
स्नेहसंमेलनांमुळे संधी
शहरात सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे वारे घोंगावत आह़े त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सराव केला जात आह़े ही संधी साधून टवाळखोर विद्यार्थी शाळेत प्रवेश करतात़ त्यातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जात़े त्यामुळे महाविद्यालयीन वातावरण बिघडू नये या उद्देशाने आवश्यक हालचाली होण्याची आवश्यकता निर्माण झाली आह़े महाविद्यालयांचा परिसर मोठा असल्याने संस्थेतर्फे आवश्यक सुरक्षा व्यवस्था केलेली असतांनासुध्दा त्यांना चकवा देत टवाळखोर विद्यार्थी धुमाकूळ घालतात़ त्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग करावी, अशी अपेक्षा व्यक्त होते.
गेल्या पंधरवडय़ातच एका महाविद्यालयीन तरुणीसोबत मैत्री करण्यास तिने नकार दिल्यामुळे एका विद्याथ्र्याने तिच्या कानशीलात लगावल्याची घटना घडली. याच आठवडय़ात काही टवाळखोर मुलांनी शाळकरी मुलगी मित्रांशी बोलत असताना व्हिडिओ क्लिप काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नदेखील केला होता़ गत वर्षीदेखील टवाळखोर विद्याथ्र्यानी एका प्राध्यापकाला वर्गातच मारहाण केली होती़ आऱसी़ पटेल मेन बिल्डिंग शाळेच्या गेटच्या बाहेर टवाळखोर विद्याथ्र्याचा नेहमी घोळका असतो़ शाळेसमोरील कॉम्प्लेक्सच्या वरांडय़ावर सदर मुले येऊन धुमाकूळ घालतात़ वरांडय़ावर उभे वा बसू दिले नाही तर दुकानदारांशी हमरीतुमरी करतात़ टवाळखोरांना अधिक दटावल्यास उलट ते दुकानदारांना धमकावत, प्रसंगी मारहाण झाल्याच्या घटनासुध्दा घडल्या आहेत़ याबाबत संबंधित दुकानदारांनी वारंवार पोलीस प्रशासनाला सांगूनही दुर्लक्ष केले गेले आह़े
या टवाळखोरांना घाबरून बहुतांशी मुली दुकानावर येत नाही, त्यामुळे या दुकानदारांचासुध्दा काही प्रमाणात व्यवसाय थंडावलेला आह़े पांबामा शाळेच्या बाहेरदेखील अशाच प्रकारे टवाळखोर शाळा-महाविद्यालय सुरू व सुटण्याच्या वेळी गर्दी करतात़ यावेळी मुलींना घेरून त्यांची टिंगलटवाळी केली जात़े
गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींना त्रास दिला जात असल्याने पोलिसांनीच अचानक महाविद्यालय परिसराला भेट देऊन टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आह़े
पोलिसांकडून चौघा तरुणांवर कारवाई
11 रोजी येथील आऱसी़पटेल मेन बिल्डिंगसमोर व फॉर्मसी कॉलेजजवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग, आरडाओरड व रोडरोमिओ करताना दीपक पाटील शिरपूर, जगदीश गिरासे दहिवद, गौरव बडगुजर शिरपूर व विशाल गिरासे पिंप्री यांना पोलिसांनी पकडले.व त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली.