मुख्याध्यापक व शिक्षकांना रविवारी शाळेत हजर रहावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:04 PM2019-03-30T12:04:50+5:302019-03-30T12:05:41+5:30
आदेश : ‘समग्र’तर्फे मिळालेल्या अनुदानाचा द्यावा लागणार हिशोब
आॅनलाइन लोकमत
धुळे : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळांना विविध कामांसाठी अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा खर्च ३१ मार्च रोजी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा रविवारीही सुरू राहणार असून, मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत हजर रहावे, असे आदेश महाराष्टÑ प्रादेशिक शिक्षण परिषदेचे प्रकलप संचालक वंदना कृष्णा यांनी दिले आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना विविध प्रकारचे वार्षिक अनुदान देण्यात येत असते. विद्यार्थी संख्येवर शाळांना हे अनुदान देण्यात येत असते. या अनुदानाचा सर्व खर्च हा ३१ मार्चपर्यंत सादर करावयाचा असतो.
या अभियानांतर्गत मिळालेला निधी कशाप्रकारे खर्च झाला? खर्च झाला नसल्यास त्याची कारणे काय? याचे उत्तर ३१ मार्च रोजी द्यावयाचे आहे. हा निधी खर्च करीत असतांना मुख्याध्यापकांना सर्व शिक्षकांना विश्वासात घ्यावे लागत असते. त्यामुळे या दिवशी सर्व शिक्षकांकडून प्रतिज्ञापत्रही भरून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरात महापालिकेचे मराठी व उर्दू माध्यमाच्या ५० व जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा आहेत.
दरम्यान ३१ रोजी सार्वजनिक सुटी असली तरी मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत हजर रहावे असे आदेश आहे. त्यामुळे रविवारी शाळेत विद्यार्थी नसतील, मात्र मुख्याध्यापक व शिक्षक हजर राहणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील गटसाधन केंद्रही सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.