धुळे जिल्हा रूग्णालयाची आरोग्य उपसंचालिकेने केली पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:44 AM2018-10-23T11:44:59+5:302018-10-23T11:46:58+5:30
१०० खाटांचे जिल्हा रूग्णालय लवकरच सुरू होणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : साक्री रोडवरील जुने जिल्हा रूग्णालय पुन्हा सुरू होणार आहे. या रूग्णालयात सुरू असलेल्या नुतनीकरणाच्या कामकाजाची पहाणी नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केली.कामासंदर्भात त्यांनी अधिकाºयांना सूचना केल्या.
साक्री रोडवरील जिल्हा रूग्णालय सर्वांनाच सोयीस्कर होते. याठिकाणी नेहमीच रूग्णांची प्रचंड गर्दी होत होती. मात्र मार्च २०१६ पासून हे जिल्हा चक्करबर्डी परिसरातील डॉ. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत झाले. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रूग्णांना बसला.
चक्करबर्डी परिसरातील रूग्णालय शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असल्याने, तेथे जाण्यासाठी रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना त्रास होत होता. त्यामुळे पूर्वीच्याच ठिकाणी जिल्हा रूग्णालय सुरू करावी, अशी मागणी होती. लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्याच्या आरोग्य मंत्र्याकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.
त्यानुसार मे २०१८ पासून येथे ओपीडी सुरू झाली होती. तूर्त या ठिकाणी रूग्णांसाठी २० खाटा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यात १० स्त्री वॉर्डात तर १० पुरूष वॉर्डात खाटा ठेवण्यात आलेल्या आहेत. रूग्णालयच्या नुतनीकरणासाठी २ कोटी ५ लाख तर विद्युतीकरणासाठी ९५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.
दरम्यान आता लवकरच या ठिकाणी १०० खाटांचे रूग्णालय सुरू होणार आहे. त्याचे नुतनीकरण सुरू आहे. या कामाची पहाणी सोमवारी आरोग्य उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केली. त्यांनी ओपीडी, सर्जिकल या विभागांची पहाणी करून अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या.
या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. विशाल पवार, गोकूळ राजपूत आदी उपस्थित होते.