आरोग्य विभागाने अधिक सतर्कता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:09 PM2020-05-09T21:09:13+5:302020-05-09T21:11:09+5:30
जिल्हाधिकारी संजय यादव : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्यात सुचना
धुळे : शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूचे एकाच दिवसांत १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आता अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असून कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी सायंकाळी आढावा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजकुमार सूर्यवंशी, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, उपायुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे उपस्थित होते.
जिल्ह्यात शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या सात जवानांचा समावेश आहे. त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचे तत्काळ विलगीकरण (क्वारंटाइन) करावे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयावर जवानांना मार्गदर्शन करावे. त्यासाठी जवान बंदोबस्तावर जाण्यापूर्वी प्रशिक्षण वर्ग घ्यावा. ते बंदोबस्तावरुन परतल्यावर त्यांच्या संस्थात्मक विलगीकरणाची कार्यवाही करावी. हिरे महाविद्यालयातील अन्य विभाग जवाहर फाऊंडेशनच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याविषयीचा प्रस्ताव उभयतांनी चर्चा करून अंतिम करावा. ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, यात आयएमएच्या तज्ञ डॉक्टरांचा समावेश करावा. याबाबतची यादी डॉ. अहिरराव यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष हस्तांतरित केली. शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून १४ मे २०२० पर्यंत धुळे महानगरपालिका क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यानंतरही नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत असताना नागरिकांची गर्दी होणे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घरीच राहत सुरक्षित राहावे असेही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले़