दोंडाईच्यात पुन्हा आरोग्य सर्वेक्षण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:55 AM2020-08-13T11:55:20+5:302020-08-13T11:57:17+5:30
मुख्याधिकाऱ्यांचा इशारा : लक्षणे दिसत असूनही स्वॅब न देणाऱ्यांविरोधात होणार आता कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईच्यात कोरोना संसर्ग वाढत असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोंडाईचा नगरपालिका व महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी पुन्हा आरोग्य सर्व्हेक्षण होत आहे. कोरोना सदृश्य, गंभीर लक्षणे असणाºयांची नोंद होत आहे. काही गंभीर लक्षणे दिसत असतील तर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वॅब देणे बंधनकारक आहे. परंतू लक्षणे दिसत असूनही स्यब देण्यास टाळटाळ केली तर त्याविरोधात संसर्ग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिला आहे.
वाढत्या रुग्ण संख्येने नागरिकांसह प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही अनेक नागरिक विना मास्क, विना फिजिकल डिस्टन्सिंग वावरत आहेत. या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना साखळी तुटत नाही. बरेच दुकानदार ग्राहकाला सॅनिटाईज न करता प्रवेश देताना दिसतात. ग्रामीण भागातील जनता बाजार व इतर कामांसाठी घोळक्याने येतात. त्यातील बरेच जण मास्क लावत नाहीत. अवैध प्रवासी वाहनांवर येतांना लगतच बसलेले असतात. त्यामुळे सुद्धा कोरोनास आमंत्रण मिळू शकते. दोंडाईचात विविध कारणाने कोरोनाने बस्तान बसविले दिसत आहे.
दोंडाईचात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मंगळवारी म्हणजे १९ रुग्ण आढळले. ९८ रुग्णांवर उपचार सुरू असून १३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत दोंडाईचा शहरात २३३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा नगरपालिका व महसूल प्रशासन पुन्हा जोरात कामाला लागले आहे.यासाठी मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे २४ कर्मचारी ६ टीममध्ये काम करीत आहेत. ४० वर्ष वयोगटातील लोकांचा सर्व्हे करून त्यात श्वसनाचे, हृदयाचे व इतर काही गंभीर आजार असतील तर त्याची नोद करीत आहेत. कोरोनासदृश्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत असतील, त्यास उपजिल्हा रुग्णलयात स्वॅब घेण्यासाठी पाठविले जाते. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी आरोग्य सर्व्हेक्षण महत्वाचे आहे. कोरोनाची इतरांना लागण होऊ नये म्हणून गंभीर लक्षणे दिसत असणाºयांनी तात्काळ स्वॅब देणे बंधनकारक आहे. स्वॅब न देणारे, टाळाटाळ करणाºयांविरोधात संसर्ग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकाºयांनी दिला आहे.
शहरात ३० कंटेन्मेंट झोन असून त्या ठिकाणी फवारणी सुरू आहे. बाधित रुग्ण व त्याचा परिसर लगेच निर्जंतुक करण्यासाठी फवारणी केली जात असल्याची माहिती पालिका आरोग्य सभापती मनीषा गिरासे यांचे सहाय्यक जितेंद्र गिरासे व आरोग्य विभागाचे शरद महाजन यांनी दिली.