हृदय हेलावणारी घटना! निष्ठुर बापाने चिमुकल्यांना तापी नदीत फेकले, घरी परतला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:57 IST2025-02-05T12:56:58+5:302025-02-05T12:57:33+5:30
Crime News: दिनांक ४ रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. मात्र संध्याकाळी एकटाच परत आला.

हृदय हेलावणारी घटना! निष्ठुर बापाने चिमुकल्यांना तापी नदीत फेकले, घरी परतला पण...
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये हृदय हेलावून टाकेल अशी घटना घडली आहे. थाळनेर येथील एका दारुड्या बापाने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना तापी नदीच्या पाण्यात फेकले आहे. पाण्यात पडल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलाविरोधात खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारुचे व्यसन होते. पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता. छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या. पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरून थाळनेर येथे आल्या होत्या. सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी (वय ६) व चेतना सुनील कोळी (वय ३) अशी दोन मुले होती.
दिनांक ४ रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. मात्र संध्याकाळी एकटाच परत आला. यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले. मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिलेले होते. संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या झाडीतून बाहेर काढण्यात आले. थाळनेर येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.