धुळे शहर व तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:47 PM2017-10-11T12:47:55+5:302017-10-11T12:50:20+5:30
जिल्ह्यातही जोरदार पाऊस : नुकसानीचे वृत्त नाही
आॅनलाईन लोकमत
धुळे : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री धुळे व शहर व तालुक्यात अतिवृष्टी झाली. तर जिल्ह्यात उर्वरीत ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. मात्र अद्याप नुकसानीचे कोठलेही अधिकृत वृत्त नाही.
जिल्ह्यात पावसाळ्यात झाला नाही असा पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत आहे. जिल्ह्यात मंगळवारीही हा सिलसिला सुरू राहिला. दिवसभरात तसेच संध्याकाळनंतरही अधून-मधून पर्जन्यवृष्टी सुरू होती. परंतु रात्री ११ वाजेनंतर संततधार पाऊस सुरू झाला. तो पहाटेपर्यंत एकसारखा कोसळत होता. धुळे शहर व तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीची नोंद झाली. परंतु नुकसानीचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.
सकाळी ८ वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत धुळे शहरात ७६ मि.मी., धुळे ग्रामीण ७१ मि.मी., साक्री तालुका ६४ मि.मी., शिरपूर तालुका १५ मि.मी. व शिंदखेडा तालुक्यात ४२ मि.मी. अशी एका दिवसांत एकूण २६८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पिकांच्या नुकसानीची बातमी
जिल्ह्यात सध्या कापूस वेचणी सुरू असून बाजरी काढण्याचेही काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. पिकांची काढणी वेळेवर होऊ न शकल्याने अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याची भीती व्यक्त होत आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असला तरी शेतकरी आधीच पिचला असून या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत भर पडणार आहे.
कृउबात कांदा भिजला!
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी करून साठविलेल्या कांद्यावर पाणी गळून तो भिजल्याने त्याचे नुकसान झाल्याचे समजते. परंतु अद्याप समितीने यास दुजोरा दिलेला नाही.
अतिववृष्टीमुळे धुळे शहरातील बहुतांश सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात शाळा, कार्र्यालयांच्या मैदानांचा समावेश आहे. पांझरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.