अतिवृष्टीत वाचविले १ हजार ४९७ नागरिकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 09:52 PM2019-12-31T21:52:09+5:302019-12-31T21:52:32+5:30

राज्य आपत्ती प्रतिसाद दल : १९ प्राण्यांनाही हलविले सुरक्षित स्थळी, वाघाडीतील स्फोटातही यशस्वी कामगिरी

Heavy rain saved the lives of 3 thousand 499 citizens | अतिवृष्टीत वाचविले १ हजार ४९७ नागरिकांचे प्राण

अतिवृष्टीत वाचविले १ हजार ४९७ नागरिकांचे प्राण

Next

देवेंद्र पाठक

धुळे : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने या वर्षात आपल्या कामांचा ठसा यशस्वीपणे उमटविला आहे़ पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत १ हजार ४९७ नागरिकांसह १९ प्राण्यांना जीवदान मिळवून दिले आहे़ याशिवाय शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर ५ व्यक्तींचे मृतदेह शोधून काढले़
संकटाच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेतली जाते़ हा दल राज्यात केवळ दोन ठिकाणी कार्यरत आहे़ त्यात धुळ्यासह नागपूरचा समावेश आहे़ या दलामार्फत शोध आणि बचाव कार्य प्रामुख्याने केले जाते़ यंदाच्या वर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यासह औरंगाबाद, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी अतिवृष्टी झाली़ सर्वत्र हाहाकार माजला असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी जवानांना पाचारण्यात करण्यात आले होते़ जवानांनी देखील बचाव कार्याचा आदेश मिळताच आवश्यक ती साधनसामुग्री घेऊन रवाना झाले होते़ यात १ हजार ४९७ नागरिकांसह १९ प्राण्यांना सुरक्षितस्थळी पोहचून त्यांचे प्राण वाचविले़ शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या ५ जणांचे मृतदेह स्वत:चा जीव धोक्यात टाकून शोधून काढले होते़
विभागामार्फत विविध विद्यालय, महाविद्यालय, गावांसह शासकीय कार्यालयात आजपावेतो जवळपास शंभराहून अधिक जनजागृती अभियान राबविण्यात आलेले आहे़ त्यात आपत्ती विषयी मार्गदर्शन, प्रात्याक्षिक, मॉक ड्रिल दाखविण्यात आलेले आहेत़ ज्यात तीन वर्षात सुमारे ४८ हजार १६४ नागरिकांसह विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता़ यंदाच्या वर्षी १२ जनजागृती अभियान राबविण्यात आले असून ७ हजार १७७ जणांनी त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे़
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे येथील कंपनीत एकूण २१४ पदे आहेत़ त्यात ३ चपळ टीम, ज्यात प्रत्येकी ४५ अधिकारी/कर्मचारी आणि १ प्रशासन टीम तयार करण्यात आलेली आहे़ प्रत्यक्षात हे दल १५ जुलै २०१६ पासून कार्यरत आहे़ बचाव आणि मदत कार्यासोबतच जवानांना वेळोवेळी विशेष असे प्रशिक्षण देण्यात येत असते़ विविध तज्ञांचे व्याख्यान, कार्यशाळा देखील होत असतात़ शारीरिक व बौध्दीकतेकडे देखील प्राधान्यांने लक्ष दिले जात असते़
पंढरपूरलाही उमटला ठसा
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे पथकाने आपली यशस्वी कामगिरीचा ठसा पंढरपूर येथे सुध्दा उमटविला आहे़ ७ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्तिक एकादशीनिमित्त दरवर्षाप्रमाणे यंदाही यात्रा भरविण्यात आली होती़ चंद्रभागा नदीला यंदा पूर आला होता़ कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पथकाला सज्ज करण्यात आले होते़ यावेळेस नदीला आलेल्या पुरात अचानक एक जण वाहून जात असल्याने आरडा ओरड झाली़ घटनेचे गांभिर्य ओळखून पथकाने पाण्यात उडी घेतली आणि त्या व्यक्तीलाही जीवदान मिळवून दिले़

Web Title: Heavy rain saved the lives of 3 thousand 499 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे