वारसा सातपुड्याचा - फुलांनी बहरला ‘महू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:25 PM2019-04-21T12:25:53+5:302019-04-21T12:58:09+5:30
कल्पवृक्षसातपुड्यातल्या आदिवासींचा मोह हा कल्पवृक्ष आहे.
सुनील साळुंखे ।
शिरपूर : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात व बोराडी, कोडीद आणि मालकातर परिसरात कल्पवृक्ष समजली जाणारी ‘महू’ची झाडे फुलांनी बहरली आहेत. आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महू फुलांची वेचणी करण्यासाठी पहाटेच्या सुमारास गाव-पाड्यातील महिला-पुरूषांची गर्दी दिसून येत आहे. महू झाडांची पिवळसर रंगाची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्यात येतात. त्यापासून आदिवासी बांधवांना रोजगारही मिळतो़ मार्च ते जून या कालखंडात येणारी महू फुले आणि त्यानंतर येणारी टोळंबी यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ हे वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीची तयारी महिला घरोघरी करत आहेत़
मोह/महु हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वाढतो. समशीतोष्ण हवामानातही तो वाढतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, ओरिसा या राज्यातील अरण्यात मोहाची झाडे आहेत. हिमालयातील टेकडयांच्या पायथ्यालाही मोह वृक्ष दिसतात. रावीपासून गंडकी नदीच्या खोºयापर्यंत मोहाची झाडे आढळतात. कमीत कमी १ ते ८ डिग्री सेंटिग्रेड व जास्तीत जास्त ४१ ते ४८ सेंटिग्रेडपर्यंतचे तापमान मोहाचे झाड सहन करू शकते. ७५० मिलिमीटर ते १८७५ मिलिमीटर पावसात मोहाची झाडे चांगल्या रीतीने वाढतात. मध्य व उत्तर प्रदेशात आंब्यांच्या झाडांच्या खालोखाल मोहाची झाडे वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात ही मोहाची झाडे आहेत. मात्र, भारतातील वाळवंटी प्रदेशात मोह आढळत नाही. मोह डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फुट उंच वाढतो. मोहाचे झाडं ६०/७० वर्षापर्यंत जगते.
फुलांचा उपयोग़़़
मोहांच्या फुलांत साखर व अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. फुलात साखरेबरोबरच कॅल्शियम व इतर जीवनसत्वे असतात. कार्बोहेड्रेटस् प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये फुलात असतात. आदिवासी तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टॉनिकपेक्षा अशा प्रकारचे अन्न हे उत्तम टॉनिक आहे.
बियांतील तेल
मोहाच्या बियांत २० ते २५% तेल असते. तसेच इतर रसायने असतात. क्रूड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांत असतात. लाकडाच्या घाणीत या बियांचे तेल काढतात. आदिवासी भाज्यांत व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा चार्म रोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. तसेच मेणबत्ती व कन्फेक्शनरी बनवण्यासाठी मोहच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण बनवण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साबण बनवणाºया कारखान्यांकडून या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोहाचे तेल तुपासारखे दिसत असल्याने शुद्ध तुपात भेसळ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अल्कोहोल व स्टॅटिक अॅसिड बनवण्यासाठी मोहाच्या बियांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कार्बन व डिंक बनवण्यासाठीही मोहाच्या बिया वापरतात. बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत आहे. एका मोहाच्या झाडापासून आकारमानानुसार ५ ते २५ किलो वाळलेल्या बिया मिळतात.
साल आणि पाने
मोहाच्या सालीत टॅनिन असते. सालींचा उपयोग रंगासाठी करतात. मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दुध देतात. असा त्यांचा अनुभव आहे. ज्या भागात जनावरांच्या चायार्ची टंचाई भासते त्या भागात मोहाची पाने चाºयाची गरज भागवण्यास उपयोगी पडतात. पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात.
मोहाचे लाकूड
मोहाचे लाकूड सागापेक्षाही कठीण असते. परंतु किडीमुळे त्याचा टिकाव लागत नाही, हा मोठा दोष मोहाच्या लाकडात आहे. मोहाच्या झाडात १७% टॅनिन असते. त्याचा रंगासाठी उपयोग होतो. पेपर बनविण्यासह विविध कामांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे इतर उत्पन्न अधिक महत्वाचे आहे.