वाढीव प्रस्तावित पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 10:32 PM2019-09-04T22:32:12+5:302019-09-04T22:32:34+5:30
जैताणे : १० ते ११ वर्षांपासून शिक्षक विना वेतन, विना मान्यता कार्यरत
जैताणे : गेल्या १० ते ११ वर्षांपासून अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पायाभूत पदांवर शिक्षक विना वेतन व विना मान्यता कार्यरत आहेत. त्यांच्या समस्यांना शासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करुन केला.
वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने मागणी मंजूर न केल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले. आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, यासाठी शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा शिक्षण विभागाच्या चारूशिला चौधरी यांना निवेदन देण्यात आले व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.
वाढीव प्रस्तावित पदांना त्वरित मंजूरी व नेमणूक दिनांकापासून वेतन मिळावे, या मागणीसाठी तसेच प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी संंघटनेचे उपाध्यक्ष विलास जाधव, आंधळकर, सचिव संजय शिंदे, प्रा.सुरेश अहिरे, सुनील पूर्णपात्रे, विलास खोपकर, शिवाजी जगताप, सुनील बैसाणे यांच्यासह राज्यातील सोलापूर, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, नासिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नांदेड, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड, मालेगाव, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, अलीबाग, पालघर, कल्याण, ठाणेसह राज्यातील पायाभूत पदांवरील व आय.टी.आय. क्षेत्रातील शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. धुळे जिल्ह्यातून पंकज पगारे, गायत्री मोरे, सचिन भदाणे, सागर पाटील, पंकज शिरसाठ, गिरीश पाठक यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रा.आंधळकर म्हणाले, पायाभूत पदांवरील शिक्षक गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विनावेतन काम करत असून त्यांना न्याय मिळायलाच हवा.
प्रा.सुरेश अहिरे म्हणाले, शिक्षण विभागाला सात हजार कोटी रुपये अनुदान अर्थ विभागाने दिले असून सुद्धा पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन का देण्यात येत नाही हा एक चर्चेचा विषय बनला असून या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे.
प्रा.संजय शिंदे यांनी सांगितले की पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन मिळणे गरजेचे असून आता त्यांना न्याय मिळालाच हवा मंत्रालयात तांत्रिक अडचणींमुळे सामना करावा लागत असून जर शासनाने या पदांवरील शिक्षकांना वेतनासहित मान्यता नाही दिल्या तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
प्रा.विलास जाधव यांनी विनावेतन काम करतांना किती समस्यांना तोंड द्यावे यांची माहिती दिली.