घर कोसळून ८० हजाराचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:28 PM2019-03-12T23:28:44+5:302019-03-12T23:29:26+5:30
सोनगीर : सुदैवाने स्वयंपाक घरात कुणी नसल्याने दुर्घटना टळली
सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर येथील डॉ.आंबेडकर चौकात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास धाब्याचे घर पडले. या घटनेत स्वयंपाकघरासह संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी स्वयंपाकघरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
सोनगीर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भटू केशव मोरे आपल्या परिवारासह राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांनी मिळेल ते काम करीत पै पै जमा करीत पत्राच्या छपराचे घर बांधले. घराशेजारील एक धाब्याची खोली काही दिवसांपूर्वी त्यांनी विकत घेऊन तेथे स्वयंपाकघर केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या स्वयंपाकघरावरील धाबे अचानक कोसळले. त्यात स्वयंपाक घरातील सर्व साहित्य, गॅस शेगडी, फ्रीज व धान्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेत स्वयंपाक खोली व संसारोपयोगी साहित्याचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी जे. बी. बांगर व कोतवाल शरद माळी यांनी केला आहे.
दरम्यान, भटू मोरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.