धुळ्यातील ‘सेवा’ रुग्णालयातील १२ कर्मचारी होमक्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:14 PM2020-04-12T22:14:21+5:302020-04-12T22:14:50+5:30
मनपाने सायंकाळी केली कारवाई : साक्रीचा कोरोनाबाधित रूग्ण सुरवातीला येथे आला होता, नंतर गेला सिव्हीलमध्ये
धुळे : कोरोनामुळे मृत झालेला साक्री येथील ५३ वषीय प्रौढ इसम जिल्हा रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी धुळ्यातील सेवा रूग्णालयात उपचारासाठी आला होता. तो ज्या कॅज्युलिटी वॉर्डात दाखल झाला होता केवळ तोच वॉर्ड आज महापालिकेच्या पथकाने सील केला आहे. तर या वॉर्डातील १२ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी दिली.
साक्री येथील ५३ वर्षीय प्रौढाचा कोरोनामुळे गुरूवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता.
दरम्यान तो प्रौढ जिल्हा रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी सर्वात प्रथम उपचारासाठी धुळे येथील साक्री रोडवर असलेल्या सेवा हॉस्पिटलमध्ये आला होता. तो येथील रूग्णालयाच्या कॅज्युलिटी वॉर्डमध्ये दाखल झाला होता. मात्र त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने या रूग्णालयातील डॉक्टरांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यावॉर्डात तो केवळ काही मिनीटे थांबला होता असे रूग्णालयातून सांगण्यात आले. तसेच याबाबत मनपाला माहिती देण्यात आली होती.
दरम्यान तो रूग्ण ‘सेवा’मध्ये आला होता अशी माहिती मिळाल्याने, महापालिकेचा आरोग्य विभाग खळबडून जागी झाला. तो रूग्ण ज्या वॉर्डात थांबला होता, केवळ तोच भाग महापालिकेच्या पथकाकडून रविवारी सील करण्यात आलेला आहे. रूग्णालयाचे इतर कामकाज नियमित सुरू आहे.
तो रूग्ण ज्या विभागात आला होता, त्या विभागातील १२ कर्मचाऱ्यांना रविवारीच होमक्वारंटाईन करण्यात आलेले आहे. दरम्यान ज्या वाहनातून तो रूग्ण आला होता, त्याचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यांनी केली सील करण्याची कारवाई
कोरोनाबाधित रूग्ण ज्या वॉर्डात थांबला होता, तो सील करण्याची कारवाई महापालिकेचे उपायुक्त शांताराम गोसावी, डॉ़ महेश मोरे, डॉ़ बी़ बी़ माळी, परिचारीका आणि आरोग्य कर्मचाºयांच्या पथकाने रविवारी सायंकाळी केली.
कोरोनाबाधित रूग्ण सेवा हॉस्पिटलमध्ये आल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयातून स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने तो रूग्ण ज्या वॉर्डात थांबला होता, तोच केवळ सील करण्यात आलेला आहे.
अजीज शेख, आयुक्त मनपा धुळे
कोरोनाबाधित रूग्ण रूग्णालयात कॅज्युलिटी वॉर्डात आला होता. त्याला जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तो काही मिनीटेच या ठिकाणी थांबला होता.
- डॉ. प्रशांत पाटील, सेवा हॉस्पिटल धुळे