बोधचिन्हांतून पर्यटकांना करणार सावध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:50 PM2017-08-20T21:50:55+5:302017-08-20T21:51:56+5:30
जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांना पत्र : पर्यटन स्थळांवर तत्काळ जनजागृतीपर फलक लावण्याचे दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर भेटी देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी तेथील धोकादायक ठिकाणी स्टंटबाजी किंवा सेल्फी पॉर्इंटवर सेल्फी काढून जीव धोक्यात टाकू नये, म्हणून बोधचिन्हे लावण्यात येणार आहेत. तशी सूचना जिल्हा प्रशासनातर्फे विविध विभागांना देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फेही जनजागृतीपर मो९’म राबविली जात असून पर्यटकांना सावध केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे मद्यधुंद अवस्थेत उंचावरून खाली पडल्याने दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी आहे. राज्यातील विविध भागातही अशा घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळातर्फे सूचित केल्यानुसार जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, महापालिका, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेला १८ आॅगस्टला पत्र दिले आहे. या पत्रात त्यांच्या अखत्यारित येणारे पिकनिक स्पॉट, धार्मिक प्रसिद्ध मंदिर, ट्रेकिंगचे ठिकाण, किल्ले या ठिकाणी बोधचिन्हे किंवा जनजागृतीपर फलक लावण्याचे सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील धोकादायक सेल्फी पॉर्इंटचे ठिकाण
जिल्ह्यात लळिंग किल्ला, तापी नदीवरील पूल, भामेर किल्ला, सोनगीर किल्ला, अनेर डॅम (ता.शिरपूर), शिंदखेडा तालुक्यातील पेडकाईदेवीचे मंदिर परिसर, अक्कलपाडा धरण ही सेल्फी पॉर्इंटसाठी धोकादायक ठिकाणे असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून जनजागृती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवर जनजागृती केली जात आहे. नुकतेच या विभागाने लळिंग येथे शिबिर आयोजित केले होते. तेथे उपस्थित पर्यटकांना मार्गदर्शन केले. आता पुढील काळात जिल्ह्यातील इतर धोकादायक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अशा कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
मद्यधुंद पर्यटकांची तक्रार करा!
पर्यटनाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसात ज्या घटना समोर आल्या आहेत, त्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. याची खबरदारी घेऊन पर्यटनाच्या ठिकाणी मद्यधुंद असलेल्यांची तक्रार तेथे असलेले वनविभागाचे अधिकारी, पर्यवेक्षक, मंदिर संस्थानचे पदाधिकारी अथवा पोलिसांकडे करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर बोधचिन्हे व जनजागृतीपर फलक लावण्याचे आदेश विविध विभागांना दिले आहेत. पर्यटन स्थळांवर सेल्फी काढताना प्रत्येकाने काळजी घ्यावी. धोकादायक क्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले जात आहे.
-अरविंद अंतुर्लीकर, निवासी उपजिल्हाधिकारी,
पर्यटन स्थळांवर अनुचित प्रकार घडू नये, या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जनजागृतीपर मोहीम सुरू आहे. पर्यटन स्थळांवर आलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना एकटे धोकादायक ठिकाणी सोडू नये. जीव जाईल अशा ठिकाणी सेल्फी काढण्यासाठीही नकार द्यावा.
-जितेंद्र सोनवणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.