इंदवे येथे गरम पाणी कुंडाची स्वच्छता मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:06 PM2019-12-14T23:06:39+5:302019-12-14T23:07:09+5:30
साक्री । जिल्ह्यातील एकमेव झरा
बळसाणे : तालुक्यातील इंदवे येथील इंदाईदेवी मंदिर परिसराजवळ गरम पाण्याच्या झऱ्याचे कुंड होते. कालांतराने या कुंडाची दुरवस्था झाली. ते बुजले गेले. या विषयी शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांना माहिती मिळाल्याने त्यांनी श्रमदानातून या कुंडाची स्वच्छता केली़
तालुक्यातील बळसाणे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर इंदवे येथे इंदाईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी वीज पडून देवीच्या पावलातून गरम पाण्याचा झरा उत्पन्न झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे राष्ट्रकुट राणी गंगाकर्णा हिने तेथे कुंड खोदण्यास दानपत्र दिले. त्यानंतर बाराव्या शतकात देवगिरी नरेश राजा सिंगनदेवा यादव यांनी तलाव खोदण्यास सहाय्य केल्याचा उल्लेख ताम्रपट व शिलालेखात आहे. या विषयीच्या नोंदी गॅझेटमध्येही आहे. या कुंडाची दुरवस्था झाली होती.
ऐतिहासीक वारसा
चाणक्य, सोळंकी, कलचुरी, राष्ट्रकुट, परमार, टाक, निकुंभ, यादव, बागुल, फारुकी, बहामनी आदी राजघराण्याचे वास्तव्य साक्री तालुक्यात होते़ तर अनेक कुळांच्या कुळदेवतांची स्थाने देखील याच तालुक्यात आहे़ साक्री-दोंडाईचा भागातील बळसाणे येथे ८ व्या शतकात राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट मंदिरांचे निर्माण या परिसरात झाले आहे.
ग्रामस्थांचा होणार फायदा
इंदाई देवीच्या मंदिराजवळ असलेला हा गरम पाण्याचा झरा जिल्ह्यातील एकमेव झरा आहे. उनपदेव-सुनपदेवच्या धर्तीवर या क्षेत्राचा विकास झाला तर इंदवे गाव पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होईल.