शॉर्टसर्किटने घराला आग; वस्तूंचे नुकसान
By देवेंद्र पाठक | Published: April 3, 2023 04:52 PM2023-04-03T16:52:08+5:302023-04-03T16:52:59+5:30
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील घटना
धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील दुमजली घराने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. घर बंद असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. साक्री येथून अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. आग विझविण्यासाठी गावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. साक्री पोलिसांत अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील होळी चाैकात रमेश आत्माराम विसपुते यांचे लाकडी आणि पत्र्याचे दुमजली घर आहे. हे घर मुरलीधर बापू चव्हाण व शिक्षक एल.एम. चव्हाण या पितापुत्राने भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. रविवारी सायंकाळी हे दोघेही घरी नसताना त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काहींच्या लक्षात आल्यावर गावातील युवक एकत्र आले. ते आग विझविण्यासाठी धावून गेले. आगीत संसारोपयोगी साहित्यासह फ्रीज, रोख रक्कम, भांडी, फर्निचर, कपडे, कूलर, ग्रॅस शेगडी, अंथरूणासह जवळपासचे सर्वच साहित्य जळून खाक झाले. खाली लाकडाचे घर आणि वरती पत्रा असल्याने घरासाठी वापरलेले सर्व लाकूड जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच साक्री येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले.
या घटनेमुळे आजूबाजू राहणाऱ्या घरमालकांनी आगीच्या घटनेची धास्ती घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत होळी चौकातील रहिवासी चिंतेत होते. साक्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रात्री उशिरा अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.