कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून; धुळ्यातील घटना : संशयित पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात
By अतुल जोशी | Published: April 13, 2024 09:23 PM2024-04-13T21:23:53+5:302024-04-13T21:24:02+5:30
प्राप्त माहितीनुसार धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरामण बैसाणे ( वय ४०) या धुणी-भांडीचे काम करतात.
धुळे : काैटुंबिक वादातून पतीने पत्नीला रस्त्यात गाठून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी धुळे शहरातील नकाणे रोडवर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिता हिरामण बैसाणे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरामण बैसाणे ( वय ४०) या धुणी-भांडीचे काम करतात. त्यांच्यात व पती हिरामण वाल्मीक बैसाणे (वय ४९) यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते. शनिवारी दुपारी अनिता या कामावरून घरी जात असताना पती हिरामण बैसाणे यांनी त्यांना पांझरा नदीकिनारच्या समांतर रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले. मारहाण करत चाकूने अनिता यांचा गळा चिरला. यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर हिरामण बैसाणे याने पळ काढला. त्यानंतर तो जवळील एका मंदिरात लपून बसला होता. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी डीवायएसपी एस. ऋषिकेश रेड्डी, पश्चिम देवपूरचे पाेलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक श्रीकांत पारधी व पथकाने धाव घेतली होती.