झोपडीला आग, सात वर्षांचा भाऊ, ४ वर्षीय बहिणीचा मृत्यू
By देवेंद्र पाठक | Published: February 18, 2024 08:06 PM2024-02-18T20:06:45+5:302024-02-18T20:06:53+5:30
धुळे तालुक्यातील लोणखेडी गावातील घटना
धुळे : झोपडीला लागलेल्या अचानक आगीत ७ वर्षांचा अमोल पवार आणि ४ वर्षांची रिना पवार यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील लोणखेडी गावात शनिवारी सायंकाळी घडली. आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला, पण त्यात अपयश आले. आजीसमोर नातवंडांचा अंत झाल्याने आजीने टाहो फोडला. आगीचे कारण समजू शकलेले नाही. धुळे तालुका पोलिसात शनिवारी रात्री १० वाजता नोंद करण्यात आली. धुळे तालुक्यातील लोणखेडी गावात नाना पवार यांचे परिवारासोबत एका झोपडीत वास्तव्यास आहे.
शेतीकामासाठी हा परिवार घराबाहेर होता. त्यावेळेस झोपडीत अमोल नाना पवार (वय ७) आणि रिना नाना पवार (४) हे भाऊ-बहीण खेळत होते. त्यांची आजी सताबाई या गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेली होती. गुरांना पाणी पाजल्यानंतर त्या आपल्या झोपडीकडे आल्या असता त्यांना झोपडीला आग लागल्याचे दिसून आले. आगीला पाहताच त्या घाबरल्या आणि त्यांनी आग-आग असे बोलून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. झोपडीत माझी नातवंडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी आरडाओरडा ऐकून क्रिकेट खेळणारी मुले आगीच्या ठिकाणी धावत आली; परंतु आग विझविण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधने नसल्याने झोपडी क्षणार्धात जळून खाक झाली. या आगीमुळे झोपडीच्या जागेवर ढिगारा तयार झाला होता. हा ढिगारा बाजूला केल्यानंतर अमोल आणि रिना या दोघा नातवांना बाहेर काढण्यात आले. ते आगीमुळे पूर्णपणे होरपळून काळे पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डाॅ. संजयकुमार खिची यांनी तपासून सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गुट्टे करत आहेत. या घटनेमुळे लोणखेडी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.