मास्क न लावल्याने मिळाला काठीचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:40 PM2020-08-22T22:40:43+5:302020-08-22T22:41:07+5:30
संडे अँकर । वर्दळीच्या चौकात कारवाई, बिनधास्त फिरणाऱ्यांवर बसला वचक
धुळे : गणेशोत्सवाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून कोणाला रस्त्यावरच उठ-बशाची शिक्षा तर कोणाला काठीचा प्रसाद देण्यात आला़ हे पाहून विनामास्क धारकांनी पोलिसांसमोर येण्याचे टाळत रस्ताच बदलून घेतल्याचे चित्र शनिवारी सकाळी पहावयास मिळाले़
शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली़ गणेशाची मुर्ती खरेदी करण्यासाठी पारंपारीक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता काही निर्बंध पोलिसांनी लावले होते़ त्यानुसार बंदोबस्त कायम असताना विनामास्क आणि विनाकारण फिरणाºयांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर कारवाईचे सत्र अवलंबिण्यात आले़ त्यात महात्मा गांधी पुतळा चौक, शिवतिर्थ अशा ठिकाणी पोलिसांनी थांबून गर्दीवर नियंत्रण मिळविले़ जे विनामास्क फिरत होते त्यांना काठीचा प्रसाद देण्यात आला़ हे पाहून अनेकांनी आपला मार्ग बदलून घेणे पसंत केले़ शिवतिर्थ चौकात स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे थांबून होते़ अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली़ तसेच शहरातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गणपती संदर्भातील बंदोबस्त सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता़ शनिवारी सकाळी मात्र काठीचा प्रसाद अनेकांना मिळाला़ पण, ज्यांनी मास्क लावला होता ते मात्र या कारवाईतून सहिसलामत सुटले असल्याचे जाणवले़
कोरोनाची पार्श्वभूमी़़
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील दक्ष राहणे गरजेचे आहे़ पण, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडत आहे़ विनामास्क फिरु नये, गर्दी टाळावी असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे़ त्याची अंमलबजावणी मात्र काही नागरिक करीत असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, गर्दी टाळा, मास्क वापरा, शक्यतोवर घराबाहेर पडू नका असे सांगण्यात येत आहे़