आईस्क्रिम दुकानाला आग, हजारोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:50 PM2019-12-24T22:50:45+5:302019-12-24T22:51:08+5:30
कृष्णकमल कॉम्प्लेक्स : शॉर्टसर्किटचा अंदाज
धुळे : शहरातील महापालिकासमोर असलेल्या कृष्णकमल कॉम्प्लेक्समधील आईस्क्रिम दुकानाला अचानक आग लागली़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली आहे़ दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
महापालिका इमारतीच्या समोरील भागात कृष्णकमल कॉम्प्लेक्स आहे़ यात असलेल्या हॉटेल प्रितम पॅलेसच्या खालच्या मजल्यावर चंदन मंधान यांच्या मालकीचे रुचिरा कॅफे आणि फास्ट फूड नावाचे आईस्क्रिमचे दुकान आहे़ सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले़ मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास याच भागात असलेल्या लॉजमधील कर्मचाऱ्यांना या दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले़ त्यांनी तात्काळ मालकांना फोनकरुन घटनेची माहिती दिली़ मात्र, ते गावाला गेले असल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कळविले़ त्यानंतर तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन बंबालाही पाचारण करण्यात आले़ काही वेळातच अग्नीशमन विभागाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणत आगीवर नियंत्रण मिळविले़
या आगीत दुकानातील डिफ्रिज, मायक्रो ओव्हन, सर्व प्रकारचे फर्निचर जळून खाक झाले आहेत़ हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़