कौठळला पार पडला आदर्श विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:12 PM2020-04-19T22:12:52+5:302020-04-19T22:13:43+5:30
सोशल डिस्टन्सिंग पाळले : कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २१ हजारांची मदत
धुळे : देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे आपला नियोजित विवाह सोहळा साध्या पध्दतीने पार पाडत कौठळ ता़ धुळे येथील नव दाम्पत्याने कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २१ हजारांचा धनादेश देवून आदर्श निर्माण केला आहे़
कौठळ येथील शिक्षिका मिनाक्षी आणि कैलास रंगराव भामरे यांचे सुपूत्र कमलेश आणि शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रमेश दत्तू पवार यांची कन्या कल्याणी यांचा कौठळ येथे रविवारी दुपारी अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा पार पडला़ या विवाह सोहळ्यात लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले़ विवाह सोहळ्याला उपस्थित मोजक्या वºहाडींनी मास्क लावले होते़ विशेष म्हणजे भटजींनीही मास्क लावून मंगलाष्टके म्हटली़
या विवाह सोहळ्याला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाकडील वºहाडींनी घेतला़ नव दाम्पत्याने २१ हजार रुपयांचा धनादेश आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केला़ आमदार पाटील यांनी नव दाम्पत्याचे कौतुक केले़
कोरोनाच्या आपत्तीमुळे नाहक खर्चाला फाटा देत साध्या पध्दतीने विवाह करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतल्याने या आदर्श विवाह सोहळ्याचे गावकऱ्यांनीही कौतुक केले असून सर्वत्र चर्चा सुरू आहे़